MumbaiNewsUpdate : मुंबईत पावसाचा हाहाकार , मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, मदतीसाठी पंतप्रधान मोदींचा फोन

Spread the love

मुंबईसह उपनगरात  पावसाचा हाहाकार  सुरु असल्याने  मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान येत्या २४ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.   मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहर आणि परिसरात २१५. ८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०९.९ मिलीमटर तर, पश्चिम उपनगरांमध्ये ७६. ०३ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. मुसळधार पावसाबरोबर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचाही वेग अधिक होता. मरीन लाइन्स परिसरात दर ताशी तब्बल १०१.४ किलोमीटर इतका वाऱ्यांचा कमाल वेग आज नोंदवण्यात आला होता.

दरम्यान मुंबईला सलग दोन दिवस पावसाने झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील, असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबईतील या स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारीक लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून स्थितीचा आढावाही घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि इतर भागांत उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले व केंद्र सरकारकडून आवश्यकते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. ही माहिती देणारे ट्विट पीएमओ इडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं  आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात, दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हिंदमाता परिसरात जाऊन पाहणी केली. 2005 नंतर आज सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसंच गरजेशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील अमीर हाऊस चाळीत तळ मजल्यावरील दुपारी साडेतीनपासून पाणी शिरण्यास सुरूवात झाली. घरांमध्ये गुढघाभर पाणी शिरल्याने १५ रहिवाशांनी वरच्या मजल्यावर स्थलांतर केले आहे. वरच्या मजल्यावरील रहिवाशांनी जेवण व राहाण्याची व्यवस्था केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ही झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे तात्काळ हटविण्यात आली आहे. तर, अतिवृष्टीमुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी विविध रेल्वेस्थानकांवर अडकून पडले होते. यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था रेल्वे स्थानकांलगतच्या मनपा शाळांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या. कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.

आपलं सरकार