Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विरोधकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात , १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली असून टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल आदी नेते ईव्हीएमबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रवाना झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणारे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला डावे पक्ष, बसपा, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन आणि सपा नेते रामगोपाल यादव आदी नेते उपस्थित होते.

या बैठकीत केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास काय निर्णय घ्यायचा? याबाबतची चर्चा करण्यात आली. तसेच १०० टक्के ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे लावून धरण्यावरही चर्चा करण्यात आली. तब्बल तासभर ही चर्चा झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू, गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांच्यासह इतर नेते निवडणूक आयोगाकडे रवाना झाले आहेत.

यावेळी ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडण्याबरोबरच उत्तर प्रदेशातील ईव्हीएमच्या सुरक्षेवरही चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज संध्याकाळी भाजपनेही मित्र पक्षासांठी आज संध्याकाळी प्रीतीभोजनाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे एनडीएच्या या बैठकीकडेही राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलमध्ये केंद्रात भाजपचंच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी विरोधकांना मात्र केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे. त्यासाठी मागच्या काही वर्षातील एक्झिट पोलचे अंदाज कसे चुकीचे ठरले आहेत, याचे दाखलेही दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!