पंतप्रधान मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार: संजय निरुपम

Advertisements
Spread the love

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत. जे काम औरंगजेब पूर्ण करू शकला नाही ते मोदी करत आहेत’, असा घणाघात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. निरुपम वाराणसीत प्रचार करत असून त्या दरम्यान मोदींच्या धोरणांवरती त्यांनी सडकून टीका केली आहे.

जसजशी वाराणसीची निवडणूक जवळ येते आहे तसतशी विरोधकांच्या विरोधाला धार चढते आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधींनी मोदींची तुलना महाभारताचा खलनायक असणाऱ्या दुर्योधनाशी केली होती. आता तर संजय निरुपम यांनी त्यांना थेट औरंगजेबाचा आधुनिक अवतार म्हटलं आहे. मुघल बादशहा औरंगजेबाने वाराणसीवर हल्ला केला होता. वाराणसीतील अनेक मंदिरं त्याने पाडली होती. काशीच्या हिंदू नागरिकांवर त्याने जिझीयासारखा जाचक कर बसवला होता, असे सांगत निरुपम यांनी मोदींवर टीका केली आहे.

‘ मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत. कॉरिडॉरच्या नावाखाली त्यांनी काशीतील शेकडो मंदिरं पाडली आहेत. बाबा विश्वनाथच्या दर्शनासाठी ५५० रुपयांचे शुल्क आकारले जाते. अनेक प्रकारचे फाइन बसवले आहेत. औरंगजेब जेव्हा काशीची मंदिरं तोडायला आला होता तेव्हा येथील लोकांनी त्याला मंदिरं पाडू दिली नव्हती. पण आता हिंदू हिताच्या आणि हिंदुस्थानवर राज्य करण्याच्या गोष्टी करणारे मोदी त्याची कसर पूर्ण करत आहेत. त्याला जे करता आलं नाही ते मोदी करत आहेत. यासाठी मी आधुनिक औरंगजेब मोदींचा निषेध करतो’ अशी शब्दात निरुपम यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष केले.