नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले पाच दिवसांचे बाळ शोधून काढण्यात पोलिसांना यश

मुंबईतील नायर रुग्णालयातून काल संध्याकाळी चोरीला गेलेले पाच दिवसांचे बाळ शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. या बाळाला पळवणाऱ्या महिलेला अग्रीपाडा पोलिसांनी सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयातून ताब्यात घेतलं आहे. अवघ्या पाच तासांत ही कारवाई करण्यात आली. नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सातमधून हे मूल चोरीला गेलं होतं. या घटनेनंतर सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता एक महिला बाळ चोरून नेत असल्याचं आढळून आलं. उत्तम दर्जाच्या सीसीटीव्ही फूटेजमुळं या महिलेची ओळख लगेचच पटली. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनीही या कामी पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या आधारे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं.
बाळ चोरल्यानंतर ही महिला त्याला व्ही. एन. देसाई रुग्णालयात घेऊन गेली. हे माझे बाळ असून तपासणीसाठी घेऊन आल्याचं ती सांगत होती. पण, पोलीस आणि सुरक्षारक्षकांना ती खोट बोलतेय असा संशय आला. त्यांनी या महिलेची माहिती तिथल्या डॉक्टरांना दिली. शिवाय, चोरी करतानाचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यामुळे ही महिला कशी दिसते याचा पोलिसांना अंदाज होता, असं नायर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
नायर रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी सात नंबर वॉर्ड व्यवस्था करण्यात येते. या ठिकाणी एक महिला पाच दिवसांच्या बाळासह झोपली होती. काही वेळाने जाग आली त्यावेळी मूल शेजारी नव्हते. तिने आजूबाजूला शोध घेतला, रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनीही शोधले मात्र मूल सापडले नाही. अखेर मुलाच्या आईसह रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. याबाबतची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलीस रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशी रंगाचे कपडे परिधान केलेली एक महिला मुलाला उचलून घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या महिलेचा शोध सुरू केला होता.