कठुआ येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराचा आज फैसला होण्याची शक्यता

जम्मू- काश्मीरमधील कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोटमधील न्यायालय आज (सोमवारी) निकाल देण्याची शक्यता आहे. पठाणकोटमधील न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू असून या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये महसूल विभागातील निवृत्ती अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तेजविंदरसिंग यांनी दहा जून रोजी निकाल देऊ, असे सांगितले होते. या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परिस्थितीवर सुरक्षा दले बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानुसार कथुआ येथील आठ वर्षांच्या मुलीचे घरातून १० जानेवारी २०१८ रोजी अपहरण झाले होते. तिला आठ दिवस एका मठात ओलीस ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि अघोरी धार्मिक विधीही केले गेले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आठवडाभरानंतर तिचा मृतदेह याच जंगलात आढळला होता. या सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशाला हादरवून सोडले होते.
सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू- काश्मीरबाहेर घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सोमवारी न्यायालय या प्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. ३ जूनला या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात एकूण ११४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात गेल्या वर्षी जून महिन्यापासून या प्रकरणावर दररोज सुनावणी झाली. गुन्हे शाखेने या प्रकरणात गावाचे प्रमुख सांजी राम, त्यांचा मुलगा विशाल, अल्पवयीन भाचा, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा यांना अटक करण्यात केली आहे. हेड कॉन्स्टेबल टिळक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्ता यांनाही अटक करण्यात आली आहे. बलात्कार आणि खून प्रकरणाचा आरोप आठपैकी सात आरोपींवर ठेवण्यात आला आहे.