ईदसाठी सुटीवर आलेल्या जवानाची ईदच्या दिवशीच दहशतवाद्यांनी केली हत्या

जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनंतनागमध्ये ईदसाठी घरी आलेल्या लष्कराच्या जवानाची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्यानंतर आता दहशतवाद्यांकरता शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. ईदनिमित्त अहमद बेग हे आपल्या सडुरा गावी आले होते. त्यानंतर संध्याकाळी दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत कुटुंबानं त्यांना रूग्णालयात हलवलं. पण, दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अहमद बेग हे शोपियनमध्ये राष्ट्रीय रायफल पथकात तैनात होते. दहशतवाद्यांच्या या कृत्यानं दहशतवाद्यांविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी पोलिस आणि पत्रकारांना लक्ष्य करत त्यांची हत्या केली आहे. ईदनिमित्त औरंगजेब हा जवान देखील घरी येत होता. त्यावेळी त्याचं अपहरण करत दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी तयार केलेली त्याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. त्यामध्ये दहशतवादी औरंगजेबला भारतीय सैन्याबद्दल माहिती विचारत होते. पण, औरंगजेबनं त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यानंतर त्यांनी औरंगजेबची हत्या केली होती.