मंदिराचा मुद्दा लवकर निकालात काढा , भगवान राम तंबूमध्ये आहेत. त्यांना तिथे ऊन लागतं : परमहंस दास

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज बैठक होती. या बैठकीत अयोध्येमधले संत, विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी आणि राम जन्मभूमी न्यासचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आताचं सरकार बदललं तर मग आम्ही राम मंदिर उभारणीसाठी गोळ्या खाव्यात का, असा सवाल संतांनी विचारला.
या बैठकीत सहभागी झालेले परमहंस दास यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. भगवान राम तंबूमध्ये आहेत. त्यांना तिथे ऊन लागतं, असं सांगून ते म्हणाले, आपल्याला उन्हापासून वाचण्यासाठी पंखा लागतो. मग देवाला असं तंबूमध्ये का ठेवायचं? हे सरकार बदलून जर विरोधकांचं सरकार आलं तर आम्हाला पुन्हा आंदोलन करून गोळ्या खाव्या लागतील, असा या बैठकीत सहभागी झालेल्या संतमंडळींचा सूर होता.
राम मंदिर उभारणीसाठी आम्ही पंतप्रधानांची भेट घेणार आहोत, असं डॉक्टर भरत दास यांनी सांगितलं. राम मंदिराच्या उभारणीची मागणी घेऊन संतांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांशी बोलणी करणार आहे, असं ते म्हणाले. राम मंदिराच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांची एक समिती नेमली आहे. यामध्ये न्या.एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे.
अयोध्येमधल्या २.७७ एकर जागेचं सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यात समान वाटप केलं जावं, असा आदेश अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता. त्याला आव्हान देणाऱ्या १४ याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांची समिती नेमण्याचा निर्णय दिला होता.