Cyber Crime : शेजाऱ्यानेच वैयक्तिक वादातून महिलेची वेबसाईटवर केली अश्लील जाहिरात…गेला गजाआड !!

वैयक्तिक द्वेषातून महिलांचा फोन क्रमांक जाहिरात वेबसाइटवर अश्लील मजकुरासह पोस्ट केल्याबद्दल एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटी निवडणुकीत झालेल्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. अल्पेश पारेख (वय ४७) असे या आरोपीचे नाव असून एका कस्टम विभागात काम करतो. ३६ वर्षीय पीडित महिलेने बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
पीडित महिला ही एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत आहे. सोसायटीची निवडणूक १५ एप्रिल रोजी पार पडल्यानंतर १७ एप्रिलपासून महिलेच्या मोबाइलवर अनोळखी फोन क्रमांकावरून फोन कॉल्स येण्यास सुरुवात झाली. मात्र, अनोळखी क्रमांकांना पीडितेने प्रतिसाद दिला नव्हता. काही दिवसांनी तिच्या फोनवर अश्लील संदेश, फोटो येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एका अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या फोनवर तिने एका व्यक्तीशी संभाषण केले. त्यावेळी त्याने पीडितेला हा फोन क्रमांक एका जाहिरातविषयक वेबसाइटवरून मिळाला असल्याची माहिती दिली. त्या व्यक्तीने जाहिरातीची लिंक पीडितेला मोबाइलवर दिल्यानंतर तिला त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या आणखी एका महिलेचा क्रमांक जाहिरातीत दिसला. या दुसऱ्या महिलेचा पती सोसायटीच्या कमिटीत पदाधिकारी आहे. त्यामुळे फोन क्रमांक पोस्ट करणारा हा इमारतीमधील असावा असा संशय बळावला.
पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक पोलिसांनी हा तपास गु्न्हे शाखेकडे दिला. आरोपीने मोठ्या हुशारीने ही जाहिरात पोस्ट केली होती. आयपी अॅड्रेस मिळू नये यासाठी खबरदारी घेतली होती. अखेर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ज्या ई-मेलवरून जाहिरात पोस्ट करण्यात आली तो आयपी अॅड्रेस मिळवण्यात यश आले असल्याची माहिती डीसीपी अकबर पठाण यांनी दिली. आरोपीला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात आयपीसी कलम ५०९ आणि आयटी कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली.