Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिजीत दिपके यांना जंतर-मंतरवर आंदोलनाची परवानगी; ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या समर्थकांना थेट आंदोलनस्थळी येण्याचे आवाहन

Spread the love

‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके आज (६ जून) सकाळी भारतात दाखल झाले असून, त्यांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून जंतर-मंतर येथे परवानगी मिळाल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

CJPने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळावर अभिजीत दिपके यांची भेट घेतली. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात न येता थेट जंतर-मंतरवर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून भारतात दाखल झाल्याची माहिती दिली. यापूर्वी त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते.

दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, त्यांच्या दिल्ली आगमनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “अभिजीत दिपके जंतर-मंतरवर शांततेत पोहोचतील. त्याआधी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत राहून होईल. पोलीस प्रशासनही सहकार्य करत आहे.”

आंदोलनाला किती लोक उपस्थित राहतील, याबाबत विचारले असता रांका म्हणाले, “आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. देशभरातील युवक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत आहेत. संपूर्ण देश या घडामोडीकडे लक्ष ठेवून आहे.”

अभिजीत दिपके यांच्या आगमनामुळे आणि जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!