Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लातूर हादरलं! वाढत्या गुन्हेगारीविरोधात भाजप आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे कठोर कारवाईची मागणी

Spread the love

लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा; शहर जिल्हा भाजपाची निवेदनाद्वारे पोलिस अधिक्षकांकडे मागणी

लातूर/प्रतिनिधी (अरुण जे कांबळे) : लातूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच सोमवार दि. १६ रोजी विद्यार्थ्याच्या हत्येची गंभीर घटना घडल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. याची दखल घेत लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने लातूरमधील गुन्हेगारी प्रवृत्तीवर तात्काळ नियंत्रण आणून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे करण्यात आली आहे.

सोमवार दि. १६ रोजी घडलेली विद्यार्थ्याची हत्या ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात विविध स्वरूपाच्या गुन्हेगारी घटना वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदनाद्वारे विद्यार्थी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कलमानुसार गुन्हे दाखल करावेत, तपास जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवून नियमित गस्त घालावी, प्रतिबंधात्मक कारवाई करावी, कोंबिंग ऑपरेशन राबवून शस्त्र तपासणी व संशयितांवर देखरेख वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती वेळोवेळी अधिकृतरित्या जाहीर करावी तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, शाळा, महाविद्यालये, पालक आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहिमा राबवाव्यात, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सदर निवेदन देताना मनपाचे गटनेते अ‍ॅड. दीपक मठपती, माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक देविदास काळे, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रविण कस्तुरे, नगरसेविका रागिणी यादव, मंडळाध्यक्ष सचिन सुरवसे, संतोष पांचाळ, संतोष तिवारी, मंदार कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्र्ते उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!