भूकंप आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालिम; एनडीआरएफसह सर्व यंत्रणांचा समन्वयाचा सराव
• भूकंपामुळे इमारत कोसळली; जखमींना तातडीने मदत मिळाली !
• आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीत शोध व बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक
• पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल
• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने आठ जणांचा जीव वाचविला
लातूर, प्रतिनिधी (अरुण जे. कांबळे) : जिल्हा क्रीडा संकुल परिसरात बुधवारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालिम (मॉक ड्रिल) पार पडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
तालमीदरम्यान भूकंपामुळे दुमजली इमारत कोसळल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली. माहिती मिळताच पोलीस, लातूर महानगरपालिका अग्निशमन दल, आपदा मित्र, होमगार्ड, डायल १०८ रुग्णवाहिका व आरोग्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ‘इन्सिडेंट रेस्पॉन्स सिस्टम’नुसार इन्सिडेंट कमांडर, ऑपरेशनल चीफ, लायझन ऑफिसर, जनसंपर्क अधिकारी आणि इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत शोध व बचाव कार्याचा सराव केला.
या उपक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे, औसा-रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औसा तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर घनश्याम अडसूळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट गौरव जांकटे तसेच अजयकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील एनडीआरएफ पथक उपस्थित होते.

लायझनिंग ऑफिसर म्हणून डॉ. आनंद कलमे, कमांड पोस्ट प्रमुख नंदकिशोर करले, कम्युनिकेशन पोस्ट प्रमुख श्रीमती शीतल शिंदे व श्रीराम वाघमारे, स्थानिक ऑपरेशन प्रमुख अग्निशमन अधिकारी बापू किरण देशमुख, उदगीरचे अग्निशमन अधिकारी श्री. क्षीरसागर, अहमदपूरचे अग्निशमन अधिकारी कैलास सोनकांबळे, मेडिकल पोस्ट प्रमुख डॉ. विशाल गरड तसेच लॉ अँड ऑर्डर प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या.

उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे डॉ. प्रमोद पाटील, एम. ए. खान, महानगर गॅसचे सेफ्टी ऑफिसर अक्षय कुचेकर यांनी निरीक्षक म्हणून सहभाग नोंदविला. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील श्रीराम वाघमारे, इनायत पटेल, सय्यद गफार आणि श्रीमती आफ्रोज शेख यांनी समन्वय साधला.

तालमीदरम्यान एनडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन सुटका करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. श्वान पथक व अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने बचावकार्य कसे केले जाते, याची माहिती देण्यात आली. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याची कार्यपद्धतीही प्रत्यक्षात दाखविण्यात आली.

भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखणे व स्थानिक पथकांची क्षमता वाढविणे हा या रंगीत तालमीचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. त्यांनी सर्व विभागांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे नमूद करत लवकरच स्थानिक बचाव पथकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

