IndiaAghadiNewsUpdate : मतचोरी : इंडिया आघाडीच्या आंदोलनाने हादरली दिल्ली , संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामा, राहुल, प्रियंका, राऊतांसह अनेक खासदार ताब्यात
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर आता राजकारण पेटू लागले आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अटकाव केला. पोलिसांनी मोर्चाला अटकाव केल्याने संतप्त झालेल्या खासदारांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.
खासदारांचा मोर्चा अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. या दरम्यान काही ज्येष्ठ खासदारांसह महिला खासदारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चाला अटकाव केला. मात्र, महिला खासदारांनी बॅरिकेट्सवर चढत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील 25 घटक पक्ष सहभागी झाले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळेंसह आदींसह जवळपास 300 खासदार मोर्चात सहभागी झाले होते.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील एक विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित बोगस मतदारांचा पुराव्यांसह आरोप केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
खासदारांकडून ठिय्या आंदोलन…
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू न देण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला. मोर्चासाठी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या परिसरात जमले. त्यावेळी पोलिसांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेट लावत खासदारांची कोंडी केली. दिल्ली पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकांसह मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात होते. बॅरिकेड्स चढून ते ओलांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील बॅरिकेट्सवर चढून ओलांडण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक आयोगावर मोर्चा कशाला?
विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ई-व्होटर लिस्टची मागणी केली आहे. त्याशिवाय, मतदानाच्या वेळीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणीदेखील विरोधकांनी केली आहे. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला.
बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) विरोधात सोमवारी (११ ऑगस्ट) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेतून मोर्चा काढला आणि ‘मत चोरी’चा आरोप केला. हे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणार होते, परंतु दिल्ली पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले आणि त्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. राहुल यांच्यासोबत प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही मोर्चात भाग घेतला. अखिलेश यांनी बॅरिकेड्स ओलांडून उडी मारली.
ताब्यात घेतलेल्या नेत्यांना संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे पोलिसांनी काही वेळाने त्यांना सोडले. पीटीआयच्या वृत्तानुसार, राहुल म्हणाले, “सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही, ही संविधान वाचवण्याची लढाई आहे, ‘एक व्यक्ती एक मत’ साठीची लढाई आहे. आम्हाला स्वच्छ आणि योग्य मतदार यादी हवी आहे.”
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘X’ पोस्ट शेअर केली आणि म्हटले, “भाजपची भ्याड हुकूमशाही चालणार नाही. ही लढाई जनतेच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्याची आहे.” “हा लोकशाही वाचवण्याचा संघर्ष आहे. ‘भारत’ आघाडीचे भागीदार संविधान फाडण्याच्या भाजपच्या या कटाचा पर्दाफाश करतील.”
अखिलेश यादव यांनी मारली बॅरिकेडवरून उडी
पोलिसांनी अडवल्यानंतर सपा अध्यक्ष अखिलेश यादव बॅरिकेडवरून उडी मारून दुसऱ्या बाजूला गेले. ते म्हणाले, ”आम्ही मते वाचवण्यासाठी बॅरिकेडवरून उडी मारत आहोत. निवडणूक आयोगाने मते कापणाऱ्यांवर कारवाई करावी. मतदार यादीतून १८ हजार मते काढून टाकण्यात आली, ज्यांची यादी मी स्वतः दिली आहे. आयोगाने प्रतिज्ञापत्र मागितले होते, आम्ही ते दिले. सर्वांना मतदान करण्याची संधी मिळाली पाहिजे.”
निवेदनादरम्यान मिताली बाग बेशुद्ध पडल्या…
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि सागरिका घोष, काँग्रेसच्या खासदार ज्योतिमणी आणि संजना जाटव पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेडवर उभ्या राहिल्या आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. यादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मिताली बाग बेशुद्ध पडल्या.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी मकर द्वार येथे गायले राष्ट्रगीत
संसदेच्या मकर द्वारसमोर मोर्चा सुरू करण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रगीत गायले. तत्पूर्वी, जेव्हा खासदारांना वाहतूक भवनाजवळील पीटीआय इमारतीसमोर थांबवण्यात आले तेव्हा ते रस्त्यावर बसले आणि ‘मत चोरी थांबवा’ अशा घोषणा देऊ लागले.
या मोर्चात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे , शरद पवार , जया बच्चन , काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.
