VBA News Update : वंचितचे सरकार आल्यास मोहम्मद पैगंबरांच्या बाबतचं बील मंजूर करु, प्रकाश आंबेडकर यांचे मुस्लिम मतदारांना आवाहन

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक लढवली जात आहे. वंचितच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर हिंगोलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुस्लीम समाजानं वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. वंचितचं सरकार आल्यास मोहम्मद पैगंबरांच्या बाबतचं बील मंजूर करु, असं देखील ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला मतदानासाठी साद घातली आहे. एकीकडे साजिद नोमानी यांनी मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीला मतदान करावे असं जाहीर आवाहन केल्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील मुस्लीम समाजाला साद घातली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोहम्मद पैगंबराच्या नावानं यावेळेस मुसलमान समाजांना आम्हाला मतदान द्यावं. कपिल पाटील विधानपरिषदेचे आमदार असताना एक बील आणलं होतं. मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या बद्दलचं वाईट लिखाण लिहलं जातं, लोकांच्या भावना दुखावल्या जातात, दंगली होतात. आम्ही मुस्लीम समाजाला आवाहन करतो की तुमचं मतदान मोहम्मद पैगंबर यांच्या नावानं वंचितला द्या, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुम्ही मतं दिली तर त्या बीलाचं कायद्यात रुपांतर होईल. नुपूर शर्मा आणि इतरांनी मोहम्मद पैगंबरांविषयी वाईट लिहिलं होतं त्यांना शिक्षा करता येईल. मोहम्मद पैगंबरांचं जे बील आहे त्यात 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणार आहोत. मुस्लीम समाजानं त्यांचं मत मोहम्मद पैगंबरांच्या बीलाला द्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
बॅग तपासणीवर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले, माझ्यासोबत च्या सगळ्या बँगांची तपासणी केली गेली आहे. माझं तर म्हणणं आहे सर्व नेत्यांच्या बॅगा तपासल्या पाहिजेत. यामध्ये कोणीही वाईट वाटून घेऊ नये. स्वतःला राग आला असं समजू नये. निवडणुकीच्या काळात कायद्यानुसार बॅगा तपासण्याचा अधिकार पोलिसांना दिलेला आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या घोषणेवर देखील प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. भाजपमध्येच त्यावरुन मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ लागलेले आहेत. पंकजा मुंडे वेगळ्या पडल्या आहेत. अजित पवार वेगळे पडले आहे. भाजप त्यांच्याच प्रश्नात अडकली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडलं नसल्याचं वक्तव्य केलं, त्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आता अजित पवार काय करतील आणि शरद पवार काय करतील हे सांगता येत नाही, दोघेही एकाच घरातील आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.