पुढचे सरकार मोदींचे नव्हे तर इंडिया आघाडीचे असेल , केजरीवाल यांचा मोदींवर घणाघात ….

नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर बाहेर येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावार तोफ डागली. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल ५० दिवसांनी अरविंद केजरीवाल यांची तिहारमधून सुटका झाली. सुटका होताच अरविंद केजरीवाल लोकसभेच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकांसंदर्भात महत्वाचे विधान करताना सांगितले की पुढचे सरकार इंडिया आघाडीचे असेल.
“निवडणुकीच्या काळात मी तुरुंगातून बाहेर येईल, असे वाटले नव्हते. हनुमानजींच्या कृपेमुळेच मी तुमच्यामध्ये आलो आहे, हा एक चमत्कार घडला आहे. दिल्लीच्या जनतेचे खूप खूप आभार. भाजपने निवडणूक जिंकली तर यूपीचे मुख्यमंत्री बदलला जाईल. योगी आदित्यनाथ यांना हटवले जाईल,” असे अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.
“पुढच्या वर्षी १७ सप्टेंबरला मोदी रिटायर्ड होणार आहेत. मग पुढचा पंतप्रधान कोण? योगी आदित्यनाथ यांना संपवून हे अमित शाह यांना पुढचा पंतप्रधान बनवतील. मोदी त्यांच्यासाठी नाही तर अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मत मागत आहेत. मोदींच्या नावाने मत देणाऱ्यांनी विचार करून मत द्या की तुम्ही मोदींना नाही तर शाह यांच्यासाठी मत देत आहात,” असा मोठा गौप्यस्फोटही अरविंद केजरीवाल यांनी केला.
३६ तास काम करून दाखवणार…
दरम्यान दिवसाचे २४ तास असतात मी पुढचे २१ दिवस ३६ तास काम करून दाखवणार. ४ जून नंतर यांचे सरकार कदापी बनत नाही. एकाही राज्यात यांच्या जागा वाढत नाहीत. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार असेल. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल. लोकशाहीला तुम्ही जेलमध्ये बंद करू शकत नाहीत, त्यामुळे मी जेलमधून लोकशाही चालवून दाखवणार,” असेही अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.
केजरीवाल पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, शिवराज सिंह आणि खट्टर साहेबांसारख्या भाजपच्या सर्व नेत्यांचे राजकारण संपवले. आता पुढचा क्रमांक योगी आदित्यनाथ यांचा आहे. यावेळी त्यांनी निवडणूक जिंकली तर दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलला जाईल.
“हे लोक प्रश्न करतात की ‘भारत’ आघाडीचा पंतप्रधान कोण असेल? माझा भाजपला प्रश्न आहे की तुमचा पंतप्रधान कोण असेल, कारण नरेंद्र मोदी पुढील वर्षी १७ सप्टेंबरला ७५ वर्षांचे होत आहेत. 2014 मध्ये 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना भाजपमधून निवृत्त केले जाईल असा नियम पंतप्रधान मोदींनी स्वतः बनवला होता त्यानुसार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि यशवंत सिन्हा निवृत्त झाले. आता पीएम मोदी पुढील वर्षी १७ सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे सरकार स्थापन झाल्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या दोन महिन्यांत हटवले जातील त्यानंतर पीएम मोदींचे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती अमित शहा यांना पंतप्रधान केले जाईल.
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, तुमच्या सर्वांमध्ये परत आल्याने मला खूप आनंद होत आहे. आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे. मी माझ्या पूर्ण ताकदीने लढेन, मला देशातील 140 कोटी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे .दरम्यान अजित पवारांचे नाव न घेता केजरीवाल म्हणाले की, पीएम मोदी काही दिवसांपूर्वी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा ज्या व्यक्तीवर केला त्या व्यक्तीला त्यांनी उपमुख्यमंत्री बनविले. पंतप्रधान मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचे आहे. पंतप्रधान मोदींना सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवायचे आहे. आपला नष्ट करण्याची त्यांनी एकही संधी सोडली नाही.