VBANewsUpdate : मोदी – भागवत संबंधांवर प्रकाश आंबेडकरांचा गौप्य स्फोट, मोदी घटना बदलणार नाही, असे का बोलत नाहीत ?

परभणी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संबंधावर निशाणा साधला यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्या संघाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले त्याच संघाच्या प्रमुखांना नरेंद्र मोदी भेटीसाठी वेळ देत नाहीत.
परभणी लोकसभा मतदारसंघांचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डख यांच्या प्रचारसभेत आंबेडकर बोलत होते. यावेळी प्रचार सभेच्या विचार मंचावर धर्मराज चव्हाण, पंजाबराव डख, सुरेश शेळके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मोदींना माहित आहे बाबासाहेब परत येणार नाहीत…
या सभेत पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी म्हणत आहेत की , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी घटना कोणीही बदलू शकत नाही पण आपल्या सर्वांना माहित आहे बाबासाहेब आंबेडकर परत येऊ शकत नाही. नरेंद्र मोदी स्वतः कधीही म्हणत नाही की मी घटना बदलणार नाही. त्यामुळे भाजप घटना बदलू शकते म्हणून घटना बदलणाऱ्या भाजप सरकारला मतदान करू नका, असे थेट आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या संबंधावर बोलताना, प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माकडीन संकट आल्यावर आपल्या पिलांनाही पाण्यात बुडवून स्वतः जिवंत राहते. स्वतःचा जीव वाचवण्साठी ती आपल्या पिलांचा जीव घेण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. तिच्या सारखीच नरेंद्र मोदी यांची वृत्ती आहे.
मोदी , मोहन भागवतांना भेटण्यासाठी वेळ देत नाहीत…
नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच नरेंद्र मोदी आज दहा वर्षे पंतप्रधानपदी राहिले आहेत. पण आता ते मोहन भागवतांची भेट देखील घेत नाहीत. मोहन भागवत हे नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी निरोप पाठवत आहेत, वेळ मागत आहेत. पण मोदींकडे भागवतांना भेटण्यासाठी देखील वेळ नाही. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जीवावर मोदी मोठे झाले, त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज त्यांना राहिली नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
व्यापाऱ्याचे आणि सरकारचे साटेलोटे
असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकऱ्यांचा कापूस दहा हजार रुपये क्विंटलने विकला पाहिजे. आपण शर्ट घालतो तो किती महाग आहे पण त्याला लागणाऱ्या कापसाचा मोबदला मात्र त्या शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आणि या सरकारचे साटेलोटे असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या सरकारला घरी बसवलं पाहिजे असे आंबेडकर म्हणाले. शुक्रवारी दुपारी भर उन्हामध्ये ही प्रचार सभा संपन्न झाली. प्रचंड ऊन असताना देखील या सभेला नागरिकांनी गर्दी केली होती.