आमची शिवसेना नकली म्हणून चेष्टा करताय , ती काय तुमची डिग्री आहे का ? मोदींना उद्धव ठाकरे यांचा सवाल

पालघर : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेला मोदी आणि शाह यांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर या दोघांवरही पालघरच्या सभेत जोरदार समाचार घेतला. आमची शिवसेना नकली , नकली म्हणून चेष्टा करत आहेत, पण ती काय तुमची डिग्री आहे का? असा घणाघाती हल्ला ठाकरे यांनी चढवला. अमित शाह बद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की , ते दुसरे एक (अमित शाह ) खंडणीबहाद्दर पक्षाचे , महाराष्ट्रात आले आणि ते सुद्धा शिवसेनेला नकली म्हणाले अरे, बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी जी शिवसेना स्थापन केली होती ती शिवसेना तुम्ही संपवाला निघाला आहात. मात्र, आज कोण आहेत त्यांच्यासोबत? अमित शाहांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती? तुमच्या स्टेपण्या किती आत आहेत ते बघा, हा भाडXX जनता पक्ष आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा मी अडीच वर्षात काय केलं ते सांगतो, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले आहे.
या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पालघर जिल्ह्याचा विकास उत्तम झाला पाहिजे, पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे. पालघरमध्ये मला वाढवण बंदर नको पण पालघरमध्ये मला एअरपोर्ट आणायचं होतं. सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला आणि इकडे वाढवण बंदर करायचं, तिकडे बारसूमध्ये रिफायनरी मीच रद्द केली होती आणि त्या जनतेचा विरोध असेल तर होणार नाही हे सुद्धा सांगतिलं होतं. सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात.
जे चांगले उद्योग आहेत जे पर्यावरणाची हानी करणार नाहीत जे माझ्या मच्छीमार समाजाच्या पोटावरती पाय देणार नाही, असे उद्योग आम्ही आणणार आहोत. माझ्यासाठी तुमची मते नसतील, तर आशीर्वाद आहे. ती भाजपासाठी मते असतील पण मी तुमच्या मतांना आशीर्वाद मानतो म्हणून माझ्याकडून पक्ष, चिन्ह सगळं जरी काढलं तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद हे आई जगदंबेच्या रूपात माझ्यासमोर उभे आहेत.
इंडिया आघाडीचे सरकार येणारच
ठाकरे पुढे म्हणाले , मी अभिमानाने अगदी आत्मविश्वासाने सांगतो की, इंडिया आघाडी 300 पार करून येणार म्हणजे येणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या हातचं असेल ते आम्ही कोणाला ओरबाडायला देणार नाही म्हणजे नाही, तुम्हाला सुद्धा देणार नाही. संपूर्ण देश आहे तुमचा होता. आता दहा वर्षे खूप झाली, दहा वर्षे संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली तर संधीचं सोनं करायच्या ऐवजी तुम्ही माती करून टाकली आता बस झालं.
पूर्वी असं वाटत होतं की मजबूत देश पाहिजे असेल तर सरकार मजबूत पाहिजे आता माझ्या लक्षात आले की जर का देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार संमिश्र पाहिजे, मिली जुली सरकार पाहिजे आणि एका पक्षाचे आणि एका व्यक्तीचे सरकार हे देशामध्ये हुकूमशाला जन्म देऊ शकतो तो आता दिला आहे. त्याला आत्ताच जर का आपण गाडून टाकला नाही आणि आपल्या सगळ्या इंडिया आघाडीचे संमिश्र सरकार या देशात आणलं नाही तर मग आपल्या देशाला कोणी वाली राहणार नाही.