मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अजित पवार थेट शरद पवार आणि कुटुंबियांवर भडकले …

बारामती : लोकसभा निवडणुकीची बारामतीची लढत बरीच चुरशीची होणार असे दिसत आहे . आज बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार , शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर चांगलेच भडकले. पवार कुटुंबियांना निर्वाणीचा इशारा देताना ते म्हणाले की , मला तोंड उघडायला लावू नका. मी जेंव्हा तोंड उघडेल तेंव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
अजित पवार पुढे म्हणाले की , त्यांनी जानकरांवर गळ टाकला होता पण मासा अडकायच्या आत आम्ही मासा काढून घेतला. अहो ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात. त्यांच्यातलेच जीन्स माझ्यात आहेत. अहो चार दिवस सासूचे असतात तर चार दिवस सुनेचे पण असतात, आजचे दिवस सुनेचे आहेत.. त्यामुळे सासऱ्यांनी आणि सासूने आता घरात बसावं. आता जर एवढे समजावून देखील वेगळं काही झालं तर तो मी शब्द वापरत नाही, नाही तर त्याची हेडलाईन होईल.. अशा शब्दात अजित पवार आज चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले.
अजित पवार यांनी आज बारामतीतील जिजाऊ भवन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी तब्बल दीड तास भाषण केले.. या दीर्घकाळ चाललेल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील विरुद्ध असलेल्या इतरांनाही इशारा दिला.
अजित पवार म्हणाले, विजय शिवतारे यांनी मला त्यांच्या मोबाईलमध्ये आलेले फोन दाखवले. ते फोन एकनाथ शिंदे यांनाही दाखवले आणि देवेंद्र फडणवीस यांनाही दाखवले. त्यांनी माघार घेऊ नये याकरता कोणी कोणी फोन केले हे सगळे समजले. इतक्या खालच्या पातळीवर जातात. मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.