सगळा देश जाणतो , राहुल देशी कि विदेशी , राहुलच्या नागरिकत्वाची अर्थशून्य बडबड : प्रियांकाने भाजपाला फटकारले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वासंदर्भात सुरू झालेल्या गोंधळाबाबत राहुल यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना उत्तर दिले आहे. राहुल यांच्या नागरिकत्वावरून निर्माण झालेला वाद अर्थशून्य असून राहुल गांधी भारतीय आहेत हे संपूर्ण देश जाणतो असे प्रियांका म्हणाल्या. राहुल यांच्यावर ते ब्रिटिश नागरिक असल्याचा आरोप झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने १५ दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. या नंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींवर निशाणा साधला होता.
‘अशा प्रकारची अर्थशून्य बडबड मी या पूर्वी कधीही ऐकलेली नाही. संपूर्ण देश जाणतो की राहुल हे भारतीय आहेत. भारतीयांसमोरच राहुल यांचा जन्म झाला, त्यांच्या समोरच ते लहानाचे मोठे झाले. सर्वांनाच हे माहीत आहे, किती अर्थशून्य बडबड आहे ही!’, असे गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्राबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रियांका म्हणाल्या.
भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहून राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा केला. या तक्रारीनंतर गृह मंत्रालयाने राहुल यांना नोटीस पाठवली. राहुल यांनी १५ दिवसांत याचे उत्तर द्यावे, अशी सूचना गृह मंत्रालयाने राहुल गांधींना केली आहे. काँग्रेस पक्षाने स्वामींच्या आरोपांचे खंडन केले आहे. राहुल यांना पाठवलेली नोटीस ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.