ParliamentNewsUpdate : संसदेत नेमके घडले काय ? गृह मंत्रालयाकडून तपासासाठी एसआयटी घोषित ….

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी बुधवारी (13 डिसेंबर) उघडकीस आली. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोघांनी खासदारांच्या बसण्याच्या जागेत उडी मारून स्मोक कँडलमधून धूर पसरवला. याशिवाय इतर दोन जणांनी कॅम्पसमध्ये निदर्शने केली आणि स्मोक कँडलमधून धूर सोडताना ‘तानाशाही नही चलेगी ‘ अशा घोषणा दिल्या. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे . दरम्यान, गृहमंत्रालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे.
याबाबत माहिती देताना गृह मंत्रालयाने सांगितले की, “लोकसभा महासचिवांच्या पत्रावर गृह मंत्रालयाने सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली आहे.” त्यात इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी सदस्य म्हणून सहभागी होतील. गृह मंत्रालयाने पुढे सांगितले की, “समिती सुरक्षेत त्रुटी कशी आली याची चौकशी करेल आणि सुरक्षेतील त्रुटीचे कारण जाणून घेतल्यानंतर कारवाई करेल.” याशिवाय सुरक्षा सुधारण्यासाठी समिती लवकरात लवकर अहवाल देईल.
विरोधकांचा हल्ला बोल ….
या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी दोन्ही सभागृहात निवेदन द्यावे, असे सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, विरोधक राजकारण करत आहेत.
On request from Lok Sabha Secretariat, MHA has ordered an Enquiry of parliament security breach incident. An Enquiry Committee has been set up under Shri Anish Dayal Singh, DG, CRPF, with members from other security agencies and experts. (1/2)@HMOIndia @PIB_India @DDNewslive
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) December 13, 2023
घटना कशी घडली?
बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि धूर पसरवला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सभागृहातील शून्य प्रहरादरम्यान, दुपारी 1 च्या सुमारास दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि त्यातील एकजण वेगाने एका टेबलवरून दुसऱ्या टेबलावर उडी मारत पुढे धावत होता. सुरक्षा कर्मचारी आणि काही खासदारांनी त्यांना घेरले. नंतर दोघेही पकडले गेले.
यावेळी संसदेच्या पिठसनावर बसलेल्या अग्रवाल यांनी संसद भवन संकुलातून पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की , “एखादी व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून पडल्यासारखे आम्हाला वाटले. तेव्हा मी पाहिले की एक व्यक्ती उडी मारत आहे. मग लक्षात आलं की दोघांनीही उडी मारली. त्यापैकी एका व्यक्तीने त्याच्या बुटातून काहीतरी काढले आणि सभागृहात धूर पसरवला.”
पाच जणांना पकडले तर एक फरार
याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून एकजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकसभेत उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव सागर शर्मा आणि डी.के. मनोरंजन असे असून अमोल शिंदे आणि नीलम यांना संसद भवनाबाहेरून घोषणा देताना पकडण्यात आले. त्यांचा पाचवा साथीदार ललित हाही चौघांसह संसदेत आला होता , मात्र जेव्हा गोंधळ झाला तेव्हा तो पळून गेला आणि फरार झाला. त्याचा सहावा साथीदार विकी यालाही पोलिसांनी पकडले आहे.
दरम्यान पीटीआयने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सर्व आरोपी गेल्या काही दिवसापासून ही योजना आखत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांशी जोडले गेले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
कोण आहेत आरोपी?
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसद भवनाबाहेरून पकडण्यात आलेल्या दोघांपैकी नीलम (42) रा. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील घासो खुर्द गावची असून अमोल शिंदे (25, रा. झरी , जिल्हा लातूर (महाराष्ट्र) अशी आहेत. तर मनोरंजन हा व्यवसायाने ऑटो चालक असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे तर सागर शर्मा हा लखनौचा रहिवासी आहे. सर्व आरोपी एकमेकांना ओळखत होते. त्यांनी हे कृत्य का केले याचा शोध घेतला जात आहे.