OBCNewsUpdate : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितला मराठा जात आणि समाजातला फरक …

नागपूर : “ओबीसीला आपल्या संवैधानिक अधिकाराच रक्षण करायच आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी एकवटलेला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ओबीसींचे मोर्चे, सभा होतील, त्याठिकाणी ओबीसी जाणार आणि आपल्या एकजुटीचा संदेश देणार अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की , गायकवाड आयोगाने जो अहवाल २०१८ मध्ये सादर केला होता. त्यामध्ये मराठा जातीचा अभ्यास न करता मराठा समाजाचा अभ्यास केला. मराठा समाजात मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या सर्व जातींचा समावेश करुन अभ्यास केला. जो चुकीचा आहे.
गायकवाड आयोगाने या सर्व जातीचा अभ्यास करुन सांगितले, की यांची लोकसंख्या जवळ ३० टक्के येते. गायकवाड आयोगाने तेव्हाच स्पष्ट केले की, देशात ५० टक्क्यांची मर्यादा घालून दिलेली आहे. ओबीसीतून आरक्षण देता येत नाही. म्हणून स्वतंत्र एसीबीसी, १५-४, १६-४ नुसार कॅटेगरी तयार करुन त्यातून आरक्षण देण्यात यावे. त्या प्रकारे सरकारने १६ टक्के आरक्षण दिले ते उच्च न्यायालयात १२-१३ टक्के कायम झालं. पण सर्वोच्च न्यायालायने नाकारले ” असे बबनराव तायवाडे म्हणाले.
ओबीसी जातीचा मराठा समाजात समावेश करुन आरक्षण
“सरकारला आरक्षण मराठा जातीला द्यायचे आहे की, मराठा समाजाला. कारण त्यांनी मराठा समाजात सहा-सात जातींचा समावेश केला. त्यापैकी कुणबी, कुणबी-मराठा लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या जाती आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या दोन जातीचा २००४ मध्ये समावेश केला. सहा जाती ज्या आधीपासून ओबीसीमध्ये आहेत. त्या जातीचा मराठा समाजात समावेश करुन लोकंसख्या ३० टक्के दाखवली. त्या ३० टक्के लोकंख्येला आरक्षण देण्याची आयोगाने शिफारस केली होती. त्यांच्या शिफारशीवरुन १६ टक्के आरक्षण देण्यात आले ” असे बबनराव तायवडे म्हणाले.
‘त्या जातींचा अभ्यास तुम्ही पुन्हा कसा करु शकता’
दरम्यान “ज्या जाती आधीपासून ओबीसीमध्ये आहेत, त्या जातींचा मराठा समाजाला आरक्षण देताना तुम्ही कसा समावेश करु शकता? हा कायदेशीर प्रश्न येतो. या संदर्भात आम्ही राज्य सरकार आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला निवेदन देणार आहोत. आता नव्याने अभ्यास करणार त्यावेळी मराठा समाजाचा अभ्यास करणार की मराठा जातीचा?. असा प्रश्न तायवाडे यांनी विचारला. आधीपासून ज्या जाती ओबीसीमध्ये आहेत, त्यांचे आरक्षण धोक्यात येऊ शकते . आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हा विषय देणार आहात. त्यावेळी मराठा जातीचा अभ्यास करा, मराठा समाजाचा नको. ज्या जाती आधीपासून ओबीसीत आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही पुन्हा कसा करु शकता” असा सवालही तायवाडे यांनी विचारला.