MaharashtraPoliticalUpdate : कोणीही उठेल आणि कसल्याही मागण्या करतील, अजित पवारांनी दिले असे उत्तर …

मुंबई : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीतील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मराठा कार्यकर्त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या किंवा सरकारमधून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
रविवारी बारामतीतील काटेवाडीत सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवरती फुल्या मारत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर बोलताना मराठा कार्यकर्त्यानी म्हटले की , “काटेवाडी ग्रामस्थांच्यावतीनं अजितदादाकडं आमची मागणी आहे की, एकतर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा दादांनी सरकारमधून बाहेर पडावं. सकल मराठा समाज तुमच्याकडं खूप आशेनं बघत आहे.”
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला, आरक्षण आणि विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी भाष्य केलं. तेव्हा काटेवाडीतील कार्यकर्त्यानं सरकारमधून बाहेर पडण्याबाबत केलेल्या मागणीवर अजित पवारांना प्रश्न विचारला.
यावर अजित पवार म्हणाले, “अख्या महाराष्ट्रात चाळीस हजार गाव आहेत. पण, काटेवाडीचा विषय काढण्यात आला. पण, मी ताबडतोब सरपंचाला फोन केला. त्याला म्हटलं, अशी मागणी कोणी केली. सरपंच म्हणाला, ‘आम्ही कुणीही तिथं नव्हतो. एका व्यक्तीनं तशी मागणी केली आहे.’ आता १४ कोटी जनतेच्या राज्यात एकानं मागणी केली आहे. त्याला माध्यमांनी उचलून धरलं.” “त्याला मागणी करण्याचा अधिकार नाही. मागणीत काहीही तथ्य नाही. कोणीही उठेल आणि कसल्याही मागण्या करतील. त्याला काहाही अधिकारी नाही. तो गावचा सरपंच, उपसरपंच किंवा कोणतरी प्रमुख असता, तर गोष्ट वेगळी होती,” असं अजित पवारांनी म्हटलं.