BRICS शिखर परिषद 2023 : ब्रिक्समध्ये आणखी ६ देशांचा समावेश

जॉन्सबर्ग : अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे ६ देश BRICS देशांच्या गटात सामील झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोसा यांनी २४ ऑगस्ट रोजी सांगितले की, आम्ही अर्जेंटिना, इजिप्त, इथियोपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांना ब्रिक्सचे पूर्ण सदस्य होण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना रामाफोसा म्हणाले की, नवीन सदस्य १ जानेवारी २०२४ पासून ब्रिक्सचा भाग बनतील. ब्रिक्ससोबत भागीदारी करताना आम्ही इतर देशांच्या हितांना महत्त्व देतो. तर मोदी म्हणाले, “तीन दिवसांच्या चर्चेतून अनेक सकारात्मक परिणाम समोर आल्याचा मला आनंद आहे. आम्ही ब्रिक्सच्या विस्तारासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारताने ब्रिक्सच्या विस्ताराला नेहमीच पूर्ण पाठिंबा दिला आहे, असा विश्वास आहे की ब्रिक्सच्या विस्तारासह नवीन सदस्य, गट आणखी मजबूत होईल. ब्रिक्सचा विस्तार करण्याच्या निर्णयामुळे बहुध्रुवीय जगातील अनेक देशांचा विश्वास आणखी दृढ होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते म्हणाले, “आमच्या टीमने ब्रिक्सच्या विस्तारासाठी मार्गदर्शक तत्त्वे, मानके, निकष, कार्यपद्धती यावर एकत्रितपणे सहमती दर्शवली याचा मला आनंद आहे.” ते म्हणाले की, भारताचे या सर्व देशांशी खूप खोल आणि ऐतिहासिक संबंध आहेत.
यापूर्वी, भारताने ब्रिक्समधील विस्ताराबाबत नवीन सदस्यांच्या निवडीमध्ये एकमत निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच विकसनशील देशांचा समूह आहे जे जगातील लोकसंख्येच्या ४१ टक्के, जागतिक जीडीपीच्या २४ टक्के आणि जागतिक व्यापाराचे १६ टक्के प्रतिनिधित्व करतात.