शिंदेशाहीमधील एक तारा निखळला , सार्थक शिंदेच्या निधनाने शिंदे कुटुंबियांवर शोककळा…

नांदेड : गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंद शिंदे यांचा पुतण्या आणि प्रल्हाद शिंदे यांचा नातू सार्थक शिंदेचं निधन झालं आहे. ३१ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. उत्कर्ष शिंदेनं इन्स्टा स्टोरीमध्ये सार्थकसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. सार्थकसोबतचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘तुझ्यासारखा कलाकार होणे नाही. तुझी कायम आठवण येईल.’ सार्थक हा दिनकर शिंदेंचा मुलगा होता. तबला आणि ढोलकीवादक म्हणून त्याची ख्याती होती. संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे कार्यक्रम व्हायचे.
ढोलकीवादनासह सार्थक भीमगीतांसाठी प्रसिद्ध होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याने नांदेडमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचं कळतंय. प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला गायकीचा वारसा पुढे आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी जपला. त्यानंतर उत्कर्ष, मधुर आणि आदर्श शिंदे हे आताच्या पिढीत लोकप्रिय ठरत आहेत. सार्थकसारख्या तरुण गायकाने अशी अचानक घेतलेली एग्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. शिंदेशाहीतील एक तारा निखळला, अशी भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.