ManipurNewsUpdate : बीएसएफच्या जवानाकडून महिलेचा विनयभंग , तत्काळ निलंबनाची कारवाई …

इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. महिलांच्या विटंबनेची आग विझत नाही तोच आज मणिपूरमधून आणखी एक चीड आणणारा व्हिडीओ सामोरं आला आहे. या व्हिडिओमध्ये सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एक जवान मणिपूरमधील एका दुकानात स्थानिक महिलेशी छेडछाड करताना दिसत आहे. या जवानाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. याबाबत बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद असे या बीएसएफ जवानाचे नाव आहे.
याबाबत बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की , ही घटना २० जुलै रोजीची असून इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात घडली आहे. या घटनेप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर सीमा सुरक्षा दलाने तपास करून त्याच दिवशी या जवानाला निलंबित केले आहे. या प्रकरणात बीएसएफच्या १०० व्या बटालियनशी संबंधित हेड कॉन्स्टेबलविरुद्ध न्यायालयीन चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारची कृत्य सहन केली जाणार नाहीत. याप्रकरणी निष्पक्ष तपास केला जाईल.
https://twitter.com/THETWITSORM/status/1683527491544129541?
भारताच्या इशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. गेल्या आठवड्यात मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तिथल्या कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना ठार मारल्याची बातमी समोर आली. महिलांची विवस्त्र धींड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाचं आणि प्रसारमाध्यमांचं लक्ष आता मणिपूरकडे वळलं आहे. त्यामुळे तिथल्या हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.