Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Update : देश आणि जगभरात डॉ. बाबासाहेबांना जयंतीनिमित्त मानवंदना…

छत्रपती संभाजीनगर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपूर्ण राज्य, देश आणि जगभरात साजरी करण्यात येत आहे. काल मध्यरात्री रात्री १२ वाजेपासून फटाक्यांच्या आतषबाजीने जयंतीला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि शहरातील भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ भीमसागर उसळला आहे.
राज्यात विविध ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आज सायंकाळी मिरवणुका निघणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगर पालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सलग १८ तास अभ्यास करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन करण्यात आले. स्पर्शरंग कला परिवाराच्या सदस्यांनी एक सेमी आकाराच्या १० हजार १३२ फोटोपासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली. तर भंडाऱ्यातील जवाहरनगर याठिकाणी मध्यरात्री १३२ केक कापून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. नाशिकच्या नांदगावातील ममता रवींद्र आहेर या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांची आकर्षक अशी रांगोळी काढत आपल्या कलेद्वारे त्यांना अनोखे अभिवादन केले आहे. बुलढाणा, छत्रपती संभीजीनगर येथे मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरात बाबासाहेबांच्या जवळपास १०० दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे. यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शो चे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे सायंकाळी करण्यात येणार आहे.