IndiaNewsUpdate : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा, इंदौरमध्ये तणाव

इंदौर : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्यामुळे इंदूरमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला असून या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटना बजरंग दलाशी संबंधित कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाबाहेर निदर्शने केली. पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली आहे.
या प्रकरणाच्या निषेधार्थ शेकडो आंदोलकांनी चंदननगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. सदर बाजार परिसरातील बारवली चौकी येथेही आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजातील वाढता रोष पाहता पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. छत्रीपुरा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
छत्रीपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पवन सिंघल यांनी सांगितले की, पठाण चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी निदर्शने केली होती. कस्तोर टॉकीजबाहेरही या चित्रपटाला विरोध झाला होता. त्याचवेळी एका व्यक्तीने पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. मुस्लीम समाजातील लोकांनी जमून आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार भादंवि कलम ५०५ अन्वये गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेने चित्रपटगृहाबाहेर गोंधळ घातला आणि घोषणाबाजीही केली. घोषणाबाजीदरम्यान कस्तोर टॉकीजवर बजरंग दलाचे नेते तन्नू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताना पैगंबर मोहम्मद साहब यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.आक्षेपार्ह घोषणाबाजीचा व्हिडिओ आगीसारखा व्हायरल झाला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून व्यवसाय बंद पाडून शांततेत निदर्शने करत पैगंबर यांच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांवर रासुका व अन्य कलमांखाली गुन्हे नोंदवण्याची मागणी केली.