लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपीचीही ओळख जाहीर केली जाऊ नये , सर्वोच्च न्यायालयात याचिका

लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपीची ओळख जाहीर केली जाऊ नये अशी मार्गदर्शक तत्वे आखण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माध्यमांनी देखील संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत लैंगिक शोषणप्रकरणातील आरोपीची ओळख जाहीर करू नये, असे निर्देश मीडियाला द्यावेत, अशीही मागणी या याचिकेत आहे.
यूथ बार असोसिएशन ऑफ इंडियाने ही याचिका दाखल केली आहे. अनेकदा खोट्या आरोपांमुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होतं. आरोपीला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात गोवण्यात आलं आणि नंतर याचा त्रास सहन न होऊन त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं आहेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
खोट्या आरोपांमुळे केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनादेखील सामाजिक धक्का बसतो. अशा प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने योग्य ते खबरदारीचे उपाय योजायला हवेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.