ShivsenaNewsUpdate : राज्यपाल , सरकार आणि सुधांशू त्रिवेदी यांचा उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार …

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची केलेली तुलना आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी हटावची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , “ कोश्यारींनी मुंबई, ठाणे परिसरातील मराठी माणसांचा अपमान केला होता आणि तेव्हा मी म्हणालो होतो की यांना आता कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतरही हे महोदय थांबले नाहीत त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा ते जुन्या काळातील आदर्श असे म्हणाले आहेत हळूहळू मला असे वाटत आहे की ही जी काही शक्कल आहे ती केवळ या राज्यपालांच्या काळी टोपीतून आलेली नाही. त्यामागे कोण आहे, या सडक्या मेंदुच्या मागील मेंदू कोण आहे? याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे.”
शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले. महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ, काल तर मी ऐकलं की कॅबिनेट बैठक ही अपवादात्मक परिस्थिती पुढे ढकलल्या जाते, तशी काल काय अपवादात्मक परिस्थती होती? तर अपवादात्मक परिस्थिती ही की यांचे बरेचसे लोकं हे गुजरातमध्ये प्रचाराला गेले. म्हणजे यांना महाराष्ट्र उघड्यावर पडला त्याची खंत नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, दैवताचा अपमान होतोय त्याची खंत नाही. मग काहीतरी गोलमाल उत्तर द्यायचं आणि वेळ मारून न्यायची त्यात आणखी भर ज्या विचारसरणीची व्यक्ती मी म्हणालो, त्याच विचारसरणीचे म्हणजे भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेंदींना एक उबळ आली. तेही काहीतरी बोलले आहेत. म्हणेज आता पक्षाबद्दल बोलावं की विचारसरणीबद्दल बोलावं, हा शोध तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे.” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. साधारणता एक प्रघात आहे की, ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्याच विचारसरणीची माणसं देशातील विविध राज्यात किंवा सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? जरासा एक शब्द वापरतोय कुणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतो आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा एक प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष सुद्धा ठरवायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. ”
राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात…
खरे तर राज्यपाल हे आपल्या महामहीम राष्ट्रपतींचे दूत असतात, राष्ट्रपती हे निपक्ष असायला पाहिजेत ते असतात आणि त्याचप्रमाणे राज्यपाल सुद्धा हे निपक्ष असायला पाहिजेत. राज्यात जर काही पेचप्रसंग उभा राहिला. तर त्याची सोडवणूक राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारच्या मध्यस्थीने करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असली पाहिजे, असा आपला एक समज आहे. आपले राज्यपाल तुम्हाला माहीत आहेत. त्यांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. कारण, राज्यपाल पदाचा मी नेहमी मान, बहुमान करत आलो आहे आणि यापुढेही करेन. पण कोणीही व्यक्ती केवळ राज्यपाल पदाची झूल त्यांच्यावर पांघरली, म्हणजे लगेच त्यांनी वेडवाकडं काहीही बोलावं हे मात्र मी आणि आमचा महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही. अशा स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.