IndiaNewsUpdate : धक्कादायक : १६ दलित कुटुंबियांना कॉफी मळ्याच्या मालकाने केले बंदिस्त , ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल , आरोपी फरार …

चिकमंगळूर : कर्नाटकातील चिक्कमगलुरू जिल्ह्यातील भाजपचे कट्टर समर्थक जगदीश गौडा आणि त्यांच्या मुलावर १६ दलितांना त्यांच्या कॉफीच्या मळ्यात अनेक दिवस कोंडून ठेवल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडितांपैकी एका गर्भवती महिलेला मारहाण झाल्यामुळे तिला आपले मूलही गमवावे लागले. या प्रकरणी बलेहोन्नूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, जगदीश गौडा आणि त्यांचा मुलगा टिळक गौडा याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर दोघेही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित जेनुगड्डे गावातील गौडा याच्या कॉफीच्या मळ्यात रोजंदारी मजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी मालकाकडून ९ लाख रुपये उसने घेतले होते. घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे त्यांना बंदी बनविण्यात आले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “८ ऑक्टोबर रोजी काही लोक बलाहोन्नूर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी जगदीश गौडा आपल्या नातेवाईकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला. पण त्या दिवशी नंतर त्यांनी तक्रार मागे घेतली.” दुसऱ्या दिवशी अर्पिता नामक पीडित गर्भवती महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि चिकमंगळुरु येथील पोलीस प्रमुखांकडे नवीन तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर एसपींनी हे प्रकरण आमच्याकडे पाठवल्यानंतर आम्ही एफआयआर नोंदवला आहे.”
या प्रकरणाचा तपास करणार्या अधिकाऱ्याने पुष्टी केली की, जेव्हा ते घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना एका खोलीत किमान १६ लोकांना बंद करून ठेवलेले दिसले. पोलिसांनी मालकाची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून दिले. त्यांना गेल्या १५ दिवसांपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यामध्ये चार कुटुंबातील १६ सदस्यांचा समावेश आहे आणि ते सर्व अनुसूचित जातीचे आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सर्व १६ जणांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित अर्पिताने म्हटले आहे कि , “मला एक दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले. या दरम्यान मला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. त्यांनी माझा फोनही जप्त केला. आरोपी जगदीश गौडा याने तिची मुलगी आणि पतीला मारहाण केल्याचे तिच्या आईने सांगितले. ती दोन महिन्यांची गरोदर होती. यामुळे तिने तिचे बाळही गमावले आहे.”
दरम्यान हा आरोप होताच भाजपच्या जिल्हा प्रवक्त्या वर्षसिद्धी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे कि , आरोपी आणि भाजप यांचा कुठलाही संबंध नाही आरोपी भाजपचा केवळ समर्थक आहे तो भाजपचा सदस्य किंवा कार्यकर्ताही नाही. एनडीटीव्ही आणि द हिंदू ने याबाबत वृत्त दिले आहे.