PMNewsUpdate : द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानला पोहोचले …

नवी दिल्ली: उझबेकिस्तानमधील समरकंद येथे प्रादेशिक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. यादरम्यान व्यापार आणि राजकारणाच्या अजेंड्यावर चर्चा होणार आहे.
व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान मोदी गुरुवारपासून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या राज्य प्रमुखांच्या परिषदेच्या दोन दिवसीय २२ व्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोविडनंतर दोन वर्षांत पहिल्यांदाच आठही राष्ट्रप्रमुख समोरासमोर बसून जागतिक आणि प्रादेशिक विषयांवर चर्चा करतील.
या परिषदेबद्दल माहिती देताना भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आगामी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पीएम मोदींसह समरकंदमध्ये पुतीन अनेक बैठका घेणार आहेत. तत्पूर्वी, अधिकृत रशियन न्यूज एजन्सी TASS ने राष्ट्रपतींचे सहकारी युरी उशाकोव्ह यांचा हवाला देऊन सांगितले की, “आंतरराष्ट्रीय अजेंड्यावरही पंतप्रधान मोदींसोबत चर्चा होईल. सामरिक स्थैर्य आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीवरही चर्चा केली जाईल. अर्थातच, संयुक्त राष्ट्र, G20 आणि SCO सारख्या प्रमुख बहुपक्षीय स्वरूपातील सहकार्यावर या शिखर परिषदेत चर्चा होईल.
भारताकडे येत आहे नेतृत्वाची संधी…
“हे विशेषतः महत्वाचे आहे, कारण डिसेंबरमध्ये भारत UN सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष असेल आणि 2023 मध्ये भारत SCO चे नेतृत्व करेल आणि G20 चे अध्यक्षपदही भारताकडे असणार आहे. याबाबत उशाकोव्ह यांनी पत्रकारांना पुढे सांगितले कि, दोन्ही नेत्यांनी जुलैमध्येही एकमेकांशी चर्चा केलेली असून डिसेंबर २०२१मध्ये अध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल. यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी फोनवर चर्चा केली होती.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी समरकंदला रवाना होत असताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते कि , ते SCO शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी समरकंद, उझबेकिस्तानला रवाना होत आहेत. ज्यामध्ये विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होईल. त्यांच्या प्रस्थानापूर्वीच्या वक्तव्यात, पंतप्रधान मोदी म्हणाले की ते स्थानिक प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच गटामध्ये बहुआयामी आणि परस्पर फायदेशीर सहकार्य विस्तारित आणि गहन करण्यासाठी उत्सुक आहेत.
बीजिंग-मुख्यालय असलेला SCO हा आठ सदस्यीय आर्थिक आणि सुरक्षा गट आहे. ज्यामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. २०१९ नंतर प्रथमच एससीओ शिखर परिषदेला वैयक्तिकरित्या उपस्थित राहणाऱ्या नेत्यांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याशी द्विपक्षीय बैठकीच्या शक्यतेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.