IndiaNewsUpdate : दलित मुलींनी वाढलेले जेवण विद्यार्थ्यांना फेकण्यास सांगितले, शाळेच्या स्वयंपाक्याचे कृत्य…

उदयपूर : राजस्थानमधील एका दलित मुलाच्या मृत्यू प्रकरणावरून देशभर संताप व्यक्त होत असतानाच उदयपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या स्वयंपाक्याला दोन दलित विद्यार्थिनींशी भेदभाव केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. बडोदी भागातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी दलित विद्यार्थिनींनी लाला राम गुर्जर यांनी बनवलेले माध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना वाढले होते जे फेकून देण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, लालराम यांनी यावर आक्षेप घेतला आणि दलित विद्यार्थिनींनी जेवण दिल्याने ते फेकून देण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी जेवण फेकले. विद्यार्थिनींनी आपल्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला, त्यानंतर त्यांनी आपल्या काही नातेवाईकांसह शाळा गाठली आणि स्वयंपाकीविरुद्ध कारवाईची मागणी केली. “अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गोगुंडा पोलिस स्टेशनमध्ये स्वयंपाक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हे प्रकरण खरे असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. दलित विद्यार्थिनींनी जेवण दिल्याने विद्यार्थ्यांनी ते पदार्थ फेकून दिले. मात्र जेवण नीट दिले जात नसल्याची तक्रार केल्यानंतर एका शिक्षकाने शुक्रवारी दलित मुलींना जेवण वाढवण्यास सांगितले.