WorldNewsUpdate : Floods in Pakistan : पाकिस्तानात विनाशकारी जल प्रलय ,एक हजाराहून अधिक लोकांना जलसमाधी , पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख ….

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शेजारील देशात पुरामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, “पाकिस्तानमधील पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःख झाले. आम्ही पीडित, जखमी आणि या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि तेथील स्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर येण्याची इच्छा व्यक्त करतो. “
Saddened to see the devastation caused by the floods in Pakistan. We extend our heartfelt condolences to the families of the victims, the injured and all those affected by this natural calamity and hope for an early restoration of normalcy.
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2022
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारच्या आवाहनानंतर आंतरराष्ट्रीय मदत पोहोचण्यास सुरुवात झाली असताना, सोमवारी पाकिस्तानमध्ये पुरामुळे मृतांची संख्या 1,061 वर पोहोचली आहे. 33 दशलक्ष लोक, म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सातव्या भागाचे लोक विस्थापित झाले आहेत यावरून पुराच्या तीव्रतेचा अंदाज लावता येतो. पाकिस्तानचे हवामान मंत्री शेरी रहमान यांनी हा “दशकातील सर्वात वाईट मान्सून” असे म्हटले आहे, तर अर्थमंत्री मिफ्ता इस्माइल म्हणाले की, पुरामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे US$ 10 अब्ज पर्यंत नुकसान झाले आहे.
लाखो लोक विस्थापित…
नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, पुरामुळे किमान 1,061 लोक मरण पावले आणि 1,575 जखमी झाले. प्राधिकरणाने म्हटले आहे की सुमारे 9,92,871 घरांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आहे ज्यामुळे लाखो लोक अन्न आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. यासह सुमारे 7.19 लाख जनावरांचाही मृत्यू झाला असून, संततधार पावसामुळे लाखो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हजारो गावे देशाच्या इतर भागापासून तुटलेली असल्याने आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्यांमुळे रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाल्यामुळे मृतांची संख्या जास्त असू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून जगाला मदतीचे आवाहन…
जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील वीज पूर्ववत करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. या भीषण आपत्तीचा सामना करण्यात अडचणी येत असलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी केली असून अनेक देशांनी एकता संदेशांसह मानवतावादी मदत पाठवली आहे. बीबीसीने पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या निकटवर्तीयाचा हवाला देत म्हटले आहे की, देशाला आंतरराष्ट्रीय मदतीची नितांत गरज आहे. अधिका-यांनी सांगितले की अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती आणि इतरांनी आपत्तीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मदत केली आहे, परंतु अधिक पैशांची आवश्यकता आहे.