BiharNewsUpdate : नितीशकुमार यांची “फ्लोर टेस्ट” होण्याच्या आधीच विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा

नवी दिल्ली : बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन झाले आहे, मात्र आता सरकारला फ्लोर टेस्ट पास करावी लागणार आहे. नितीश कुमार आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. नितीशकुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत महाआघाडीसोबत सरकार स्थापन केले आहे. आज त्यांच्या नव्या सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घ्यायचा आहे. नितीशकुमार यांनी यापूर्वीच सरकारकडे भरघोस बहुमत असल्याचा दावा केला आहे. पण आज सभागृहात फ्लोअर टेस्टचा दिवस आहे. त्यासाठी विधानसभेची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून विधानसभेचे कामकाज सुरू झाले आहे. परंतु सभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी आपला राजीनामा दिला आहे.
दरम्यान सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विधानसभेला संबोधित करताना सभापती म्हणाले की, माझ्यावर अनेक आरोप झाले असे म्हणत त्यांनी आपला राजीनामा दिला. सभेचे कामकाज सुरू झाल्यावर सभापती विजय सिन्हा म्हणाले की, मला उत्तर द्यायचे होते म्हणून मी आधी राजीनामा दिला नाही. आपण नियमांतर्गत काम करत असून नेहमीच नियमानुसार काम केले आहे. त्यामुळे आपल्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य आहे.
बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा राजीनामा देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी सत्ताधारी महाआघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती.
विशेष म्हणजे आज होणाऱ्या विशेष अधिवेशनात नवे महाआघाडी सरकार शक्तीप्रदर्शन करणार आहे. महाआघाडीकडे बहुमताचा आकडा (१२२) पेक्षा जास्त म्हणजे १६४ आमदार आहेत, तर भाजपकडे ७६ आमदार आहेत. महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) सीपीआय-एमएल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) CPI(M) आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्थानी अवाम मोर्चा, याशिवाय एक अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष JDU यांचा समावेश आहे.
भाजप नेते नितीन नबीन म्हणाले की, आम्ही विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतलेला नाही. ते अजेंडाच्या शीर्षस्थानी नाही. आम्ही “पल्टू” कुमार आणि अविश्वास प्रस्ताव आणलेल्या या मागच्या दरवाजाच्या सरकारचा पर्दाफाश करू इच्छित आहोत.” दरम्यान भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्ते निखिल आनंद यांनीही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले.