ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : अखेर शिवसेनेची राष्ट्रपतीपदासाठी एनडीए उमेदवाराला पसंती

मुंबई : हो नाही , हो नाही म्हणत म्हणत अखेर राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत हि घोषणा केली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले कि, शिवसेना कधीच कोत्या मनाने वागलेली नाही. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना खासदारांनी व्यक्त केली होती. त्याचा सन्मान करत शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Shiv Sena will support Droupadi Murmu for Presidential elections: Shiv Sena chief Uddhav Thackeray pic.twitter.com/Y6LrGWdlVc
— ANI (@ANI) July 12, 2022
दरम्यान शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव आणल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. “माझ्यावर खासदारांनी कोणताही दबाव आणलेला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचे राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली. शिवसेनेने याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना कधीच कोत्या मनाने वागलेली नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“गेल्या ४-५ दिवसांत आदिवासी आणि त्या समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली आहे. त्यात एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, अमशा पडवी, निर्मला गावित, पालघरच्या जि.प. अध्यक्षा आल्या होत्या. एसटी-एससी समाजातल्या लोकांनी विनंती केली आहे की पहिल्यांदा आदिवासी समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला त्याचा आनंद होईल. या सगळ्यांचा मान ठेवून शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे”, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.