MaharashtraPoliticalUpdate : बंडखोर मंत्र्यांच्या खात्याचे महाविकास आघाडीत फेरवाटप …

मुंबई : राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या सोयीच्या दृष्टीने मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल केले आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांनीही बंड केले असून या सर्व बंडखोरी करणाऱ्या मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. या मंत्र्यांच्या खात्यांचा पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवण्यात आला आहे.
सध्याच्या राजकीय स्थितीनुसार सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब , शंकर गडाख हे कॅबिनेट मंत्री सध्या मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती सुभाष देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या खात्यामध्ये फेरबदल करताना ती खाती शिवसेकडेच राहतील याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
राज्यमंत्र्यांचा पदभार असा आहे …
कॅबिनेट मंत्र्यांबरोबरच राज्यमंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल करण्यात आला असून शिवसेनेकडील सर्व खाती राष्ट्रवादीच्या ४ तर काँग्रेसच्या २ मंत्र्यांना देण्यात आली आहेत. नव्या बदलानुसार शंभूराज देसाई यांच्याकडील गृह ग्रामीण खाते राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्याकडे तर काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांच्यावर वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता खात्याची जबाबदारी असेल. काँग्रेसच्याच सतेज उर्फ बंटी पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार मिळाला आहे. राजेंद्र यड्रावकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ही खाती विश्वजीत कदम यांना तर वैद्यकीय शिक्षण आणि वस्त्रोद्योग खाते प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आले असून सतेज पाटील यांना अन्न व औषध प्रशासन तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना सांस्कृतिक खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
दरम्यान शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेल्या बच्च कडू यांच्या खात्यांचा कारभार हा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे (शालेय शिक्षण) यांना , काँग्रेसचे सतेज पाटील (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार) राष्ट्रवादीचे संजय बनसोडे (महिला व बाल विकास) आणि राष्ट्रवादीचेच दत्तात्रय भरणे (इतर मागास बहुजन कल्याण) यांना देण्यात आला आहे.