CongressNewsUpdate : राहुल गांधी ईडी चौकशी प्रकरणी काँग्रेसचे आंदोलन

मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून मुंबईत आज एक मोर्चा काढण्यात आला. ‘नॅशनल हेराल्ड ‘ प्रकरणात गांधी कुटुंबीयांनाईडीकडून चौकशीसाठी पाठवण्यात आलेले समन्स आणि राहुल गांधी यांची तीन दिवसांपासून ईडीकडून सुरू असलेली चौकशी याच्याविरोधात हँगिंग गार्डन ते राजभवन या दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला . या मोर्चात काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला असून बॅरेकेडिंग करुन मोर्चेकरांना रोखून धरले होते. काँग्रेस नेते नाना पटोले,अशोक चव्हाण, भाई जगताप, वर्षा गायकवाड, हुसेन दलवाई, अस्लम शेख आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. द्वेषापोटी गांधी परिवाराला बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र भाजपने रचलं आहे ते संपवण्यासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेला टिकवण्यासाठी भाजपच्या हुकूमशाही विरोधात करण्यात येणाऱ्या राजभवन येथे आंदोलन करण्यात येत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नॅशनल हेराल्डमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांची मागील तीन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. बुधवारी (15 जून) सुद्धा सकाळपासून राहुल गांधी यांची चौकशी झाली. त्यानंतर रात्री उशीरा 8.30 वाजेच्या सुमारास त्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सलग तीन दिवस चौकशीनंतर राहुल गांधी यांनी गुरुवारी एक दिवस चौकशीला येता येणार नाही, त्यासाठी मुभा द्यावी अशी विनंती ईडीकडे केली. राहुल गांधी यांची विनंती ईडीने मान्य केली आहे. त्यामुळे गुरुवारी राहुल गांधी यांची चौकशी होणार नाही. मात्र, शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे.
मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात राजभवन येथे आंदोलन. https://t.co/jsNugalAlX
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 16, 2022