MaharashtraPoliticalUpdate : भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर …

मुंबई : भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना मात्र संधी मिळालेली नाही. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि , आम्ही पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रयत्न केला परंतु शेवटी केंद्रीय कार्यकारिणीने घेतलेला निर्णय आमच्यासाठी बंधनकारक असतो.
श्रीकांत भारतीय हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस असून, एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय भाजपाच्या किसान मोर्चाचे ते राष्ट्रीय कार्यकारणीत सदस्य देखील आहेत. २०१४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या वॉर रुमच्या प्रमुख पदाची धूरा देखील सांभाळलेली आहे. तर उमा खापरे या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगसेविका म्हणून त्यांनी काम केले आहे. सलग दोनदा त्या नगरसेविका झालेल्या आहेत. शिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एवं बिहार राज्यों में होने वाले आगामी विधान परिषद द्विवार्षिक चुनाव- 2022 हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/cOzfHhaDQY
— BJP (@BJP4India) June 8, 2022
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे. २ जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर ९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये लढत होण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. हे पाचही उमेदवार आजच अर्ज दाखल करणार आहेत. विधान परिषदेसाठी आम्ही पाचवी जागाही लढवत असून हि जागा जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान भाजपसोबत असलेल्या सदाभाऊ खोत यांनाही यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
या सदस्यांचा कार्यकाळ होत आहे पूर्ण
विधान परिषदेवर भाजपकडून असलेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत तसेच दिवंगत नेते आरएस सिंह यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते, मंत्री सुभाष देसाई हे निवृत्त होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड यांचाही कार्यकाळ संपत आहे.