Aurangabad Crime Update : गुटखा विक्रेत्याकडून लाचेची मागणी पोलीस निरीक्षकासह पोलिसाविरुद्ध गुन्हा…

औरंगाबाद : दौलताबाद पोलिस निरीक्षकांनी एका गुटखा व्यापार्याला लाचेची मागणी करून आपल्या कर्मचार्या मार्फत १२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यामुळे एसीबी ने लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात या महिला पोलीस निरीक्षक कार्यरत होत्या त्याच दौलताबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सुनिता मिसाळ असे या महिला पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक सुनीता मिसळ दोन महिन्यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून बदली होऊन आल्या होत्या आणि त्यांनी पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली होती. याच पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज असलेल्या राजश्री आडे यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात आपली इतकी चांगली ओळख आणि दारात निर्माण केला होता कि , मार्चमध्ये जेंव्हा त्यांना कर्मचाऱ्यांनी निरोप दिला तेंव्हा महिला कर्मचारी आडे यांच्या गळ्यात पडून रडल्या होत्या . येथील महिला कर्मचाऱ्यांना समजून घेताना आडे यांनी त्यांच्यासाठी अनेक उपक्रम आपल्या पोलीस ठाण्यात राबवले होते.
औरंगाबाद शहर पोलीस दलात एक चांगल्या महिला पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांची ओळख आहे. आडे यांची बदली सुरक्षा शाखेत झाल्यानंतर त्यांच्या जागी सुनीता मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आणि दोन महिने होत नाहीत तोच हा प्रकार घडला.
खरे तर या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी पोलीस निरीक्षक सुभाष तावरे यांच्याकडे दौलताबाद पोलिस ठाण्याचा कारभार सोपवून त्या सुट्टीवर निघाल्या होत्या. या प्रकरणी एसीबीने दिलेल्या माहितीनुसार दौलताबाद पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ दौलताबाद पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर तक्रारदार यांना पोलीस स्टेशन दौलताबाद हद्दीत अवैध गुटखा विक्री व वाहतूक करू देण्यासाठी, दर महिन्याला एक केस व मासिक हप्ता म्हणून २५,०००/ रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु वाटाघाटीनंतर १२,००० रुपयांत व्यवहार ठरला.
दरम्यान गुरुवारी दुपारी दौलताबाद येथील गुटखा विक्रेत्याकडून रजेवर निघालेल्या पीआय मॅडमचे १० हजार रुपये आणि स्वत:साठी २ हजार असे १२ हजार रुपये स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. हवालदार रणजीत सहदेव शिरसाठ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अशी झाली तक्रार
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार तरुणाने दोन महिन्यांपूर्वी बंदी असलेला गुटखा विकला होता. दौलताबाद पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गुटखा विक्रेत्याला पोलिस ठाण्यात बोलावून पीआय मिसाळ यांची भेट घालून दिली. त्यावर त्यांनी त्याला दोन दिवसांनी यायला सांगितले. दरम्यान त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्याचा हेतू लक्षात येताच त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. अधिकाऱ्यांनी २४ मार्च रोजी व्हॉईस रेकॉर्डरसह पंचासह पोलिस ठाण्यात तक्रार पाठवली. हि माहिती मिळताच मिसाळ यांनी कॉन्स्टेबल रणजीत यांना दोघांचा शोध घेण्यास सांगितले, परंतु त्यांना त्यांच्याकडे कोणताही रेकॉर्डर सापडला नाही.
वाटाघाटींनंतर असा ठरला व्यवहार …
दरम्यान वाटाघाटीनंतर मॅडमसाठी दरमहा १० हजार आणि हवालदाराला २ हजार रुपये देण्याचा करार झाला. येत्या दोन दिवसांत पैसे देऊ, असे आश्वासन त्याने दिले. त्यानुसार , एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दौलताबाद परिसरात सापळा रचला तेंव्हा ठरल्यानुसार तक्रारदार हवालदार रणजीतला भेटला आणि त्याने तक्रारदाराला १२, ००० रुपये देण्यास सांगितले, त्यातील १०,००० रुपये पीआयच्या वाट्याचे आणि २,००० रुपये स्वत:साठी अशी लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलला रंगेहात पकडले.
या प्रकरणात पोलिस अधिक्षक राहूल खाडे, अपर पोलिस अधिक्षक विशाल खांबे, उपअधिक्षक मारुती पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलिस कर्मचारी चांगदेव बागूल, राजेंद्र जोशी, विलास चव्हाण, प्रकाश घुगरे, आशा कुंटे यांनी हि कारवाई पार पाडली.