RajThackearyNewsUpdate : माफी नाही तर प्रवेश नाही , राज ठाकरेंच्या दौऱ्याला भाजप खासदारांचा विरोध कायम

अयोध्या : आधी मराठी – अमराठी असा वाद करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या राज ठाकरे यांना “काहीही झाले तरी उत्तर प्रदेशची माफी मागावी अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही…” या आपल्या भूमिकेवर भाजपा खासदार बृजभूषण सिंह ठाम असल्यामुळे राज यांच्या दौऱ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत . त्यात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही आपला दौरा जाहीर करीत , ‘असली आ रहे हैं, नकली से सावधान,’ अशी पोस्टरबाजी करीत मनसेला डिवचण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘उत्तर प्रदेश-बिहारसह संपूर्ण देशातील जनता राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र तेथील खासदाराला काय वाटतं, हे त्यांचं त्यांना माहीत,’ अशी प्रतिक्रिया मनसेनेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी भाजपचे खासदार सिंह यांनी यूपीत मोठं शक्तीप्रदर्शन केले आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी साधू महंत यांची बैठक होत आहे. या बैठकीत हिंदू धर्माचार्य या नात्याने राज ठाकरेंना माफी मागण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्यास इतक्याच संख्येने त्यांचे स्वागत करू असेही साधू महंतांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंना उत्तर भारतीयांसमोर नतमस्तक व्हावं लागेल….
यावेळी खासदार बृजभूषण सिंह म्हणाले की, उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंना माफी मागावीच लागेल. राज ठाकरेंना उत्तर भारतीयांसमोर नतमस्तक व्हावं लागेल. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही तोवर अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. राज ठाकरेंच्या विरोधाला ५ लाख लोक असतील. आमची माफी मागितली नाही तरी चालेल संतांची माफी मागावी असं त्यांनी सांगितले. तसेच राज ठाकरेंना माफी मागण्याची एक संधी आहे. माफी मागितली नाही तर झारखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार याठिकाणी आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही. राज ठाकरे आतापर्यंत कधी महाराष्ट्राच्या बाहेर आले नाहीत त्यामुळे हा विरोध करता आला नाही. आता समोर यावं २००८ मध्ये उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली. तेव्हापासून आमचा हा राग आहे. माझं वैर महाराष्ट्राशी नाही. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी ५ लाख लोकांनी ५ जून रोजी अयोध्येत जमावे असे आवाहनही बृजभूषण सिंह यांनी केले आहे.
याबद्दल बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले कि , ‘खासदाराच्या इशाऱ्याबाबत आता लगेच प्रतिक्रिया देणं योग्य नाही. कारण त्यातून आणखी तेढ निर्माण होईल,’ अशी भूमिका नांदगावकर यांनी मांडली आहे. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीबाबत बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ‘उत्तर प्रदेश-बिहारसह संपूर्ण देशातील जनता राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र तेथील खासदाराला काय वाटतं, हे त्यांचं त्यांना माहीत,’ असं नांदगावकर म्हणाले.
‘असली आ रहे हैं, नकली से सावधान’
दरम्यान राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचे सांगताच युवासेनेचे प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. तसंच ‘असली आ रहे हैं, नकली से सावधान,’ अशा आशयाचे पोस्टर्स लावत शिवसेनेकडून मनसेला डिवचण्यात आलं. या मुद्द्यावरून बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. ‘असली कोण आणि नकली कोण हे तुम्ही कशाला सांगताय, ते लोकच ठरवतील आणि आम्ही असली आहोत हे सांगण्याची वेळ तुमच्यावर आली आहे,’ असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.