AurangabadCrimeUpdate : मोठी बातमी : तांदळाच्या पोत्यात निघाले १ कोटी साडेनऊ लाखाचे घबाड … !!

औरंगाबाद : तांदळाच्या विक्रीकेंद्रात पोलिसांना तांदळाच्या पोत्यांसोबतच नोटांच्या बंडलांची थप्पीही सापडली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहागंज भागातील एका किराणा दुकानावर छापा टाकून तब्बल एक कोटी ९ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.या प्रकरणी गुन्हेशाखेने आयकर विभागाचे उपसंचालक सुशील भगवान शेंडगे यांच्याशी पत्रव्यवहार करुन त्यांना कारवाईत सहभागी होण्याची विनंती केली.त्यानंतर आयकर विभागाचे वसंत सुताने आणि अमितकुमार श्रीदेवनाथ सिंह यांनी घटनास्थळी भेट देत कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणी दुकान मालक आशिष सावजी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हा सर्व हवालाचा असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहागंज ते चेलीपुरा या रस्त्यावर ‘सुरेश राईस’ या दुकानात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार खात्री करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि त्यांच्या पथकाने ‘सुरेश राईस’ या दुकानाच्या बाहेर दिवसभर रेकी केली. दिवसभरात अनेक लोकांनी या दुकानाला भेट दिली. पण त्यातील अनेक जण कोणतेही किराणा सामान न घेता रिकाम्या हाताने दुकानातून परतत होते, ही महत्वाची बाब पोलिसांच्या पथकाच्या नजरेतून सुटली नाही.
तांदळाच्या पोत्यात निघाले घबाड
मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यावर पोलिस पथकाने अखेर सायंकाळच्या सुमारास थेट दुकानावर छापा मारला. मात्र, प्रारंभी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. परंतु, दुकानाचा काही भाग पार्टीशन करून वेगळा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी शोधमोहीम राबवली. तेथील दृश्य पाहून पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, तेथे काउंटर तसेच खाली तांदळाच्या पोत्यांऐवजी नोटांची बंडले रचून ठेवलेली होती.
पोलिसांनी या पैशांचा हिशेब दुकानदार आशिष सावजी याला विचारला. मात्र, त्याला त्याबाबत व्यवस्थित काहीही सांगता आले नाही. त्यामुळे किराणा दुकानाच्या नावाखाली हवालाचे रॅकेट सुरु असल्याचा संशय पक्का झाल्याने पोलिसांनी सावजी याला ताब्यात घेऊन सिटी चौक पोलिस ठाण्यात आणले. तेथे आयकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांच्या समक्ष ताब्यात घेलेल्या बंडलांमधील रक्कम मोजण्यात आली. ही रक्कम एक कोटी ९ लाख ५० हजार रुपये इतकी भरली. आशिष सावजी याच्या विरोधात आयकर विभागातर्फे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे..