MumbaiNewsUpdate : ‘सिल्व्हर ओक ‘ हल्लाबोल आंदोलन : पोलीस घेत आहेत आता अॅड. जयश्री पाटील यांचा शोध

मुंबई : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला बोल आंदोलन प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या बरोबरच त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनाही पोलिसांनी सह आरोपी केले आहे. दरम्यान सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडले असून आता पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दि. ९ रोजी गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर केल्यापासून जयश्री पाटील यांनी पोलिसांचे संरक्षण सोडले आहे. गुणरत्न सदावर्तेना कोर्टात हजर केल्यावर त्या उपस्थित होत्या मात्र तेव्हा त्या पोलिस संरक्षणाशिवाय आल्या होत्या असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान आम्ही शरद पवार , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कारवाई केल्यामुळे केवळ सूद भावनेतून आम्हाला या प्रकरणात टार्गेट केले जात असल्याचे निवेदन अॅड. जयश्री पाटील यांनी न्यायालयाच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते मात्र पोलिसांच्या तपासानुसार शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा कट गुणवंत सदावर्ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आंदोलनाच्या आदल्या दिवशी शिजला. पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा सल्ला गुणवर्तेंच्या पत्नी जयश्री यांनी दिला, अशी माहिती मुंबई पोलिसांतर्फे बुधवारी गिरगाव न्यायालयात देण्यात आली. त्यानंतर जयश्री पाटील यांना वॉण्टेड दाखवण्यात आले असून मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. जयश्री पाटील यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून त्या नॉटरिचेबल आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी त्यांच्या तपासामध्ये हाती आलेले काही पुरावेदेखील न्यायालयास सादर करण्यात आले. यामध्ये सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सूर्यवंशी याने सदावर्ते यांना ८५ लाख रुपये जमा करून दिले असून, त्याला पुण्याहून अटक करण्यात आली. त्याच्यासमक्ष इतर आरोपींची देखील चौकशी करायची असल्याचे सांगून त्यांनी पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र सदावर्ते यांच्या वकिलांनी पोलिस कोठडीत विरोध केला. अभिषेक पाटील याची आंदोलनामधील भूमिका पोलिसांच्या वतीने कोर्टात विस्तृतपणे सांगण्यात आली.