IndiaPoliticalUpdate : संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा म्हणून मुलांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न : शरद पवार

नवी दिल्ली : देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. देशातील विविध प्रकारच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मुलांच्या मनात विष पेरत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राजधानी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक विभागाचे संम्मेलन आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा आरोप केला.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा आघाडीचे संम्मेलन आयोजित करण्यात आले होते, यामध्ये शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे संयोजक बनविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाली असताना ही नवीन तोफ शरद पवार यांनी डागली आहे. जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. भाजप देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी देखील जिव्हारी लागणारी टीका त्यांनी केली. देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे.
यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले कि , देशात महागाई ही एक मोठी समस्या बनली आहे. इंधनाचे दर आसमानाला टेकले आहे. शेतकरी आत्महत्या होत आहेत , असे असताना काश्मीर फाईल या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगेंडा उभा केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती. मात्र ज्या लोकांचा हातात सत्ता तेच याचा प्रचार करीत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता शरद पवार यांनी केली. केंद्र सरकार या काश्मीर वासियांना मदत का करीत नाही. मात्र फक्त आरोप लावण्याचे काम वर्तमान सत्ताधारी करतात असे सांगत शरद पवार म्हणाले, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारे देताना एका समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.