IndiaPoliticalUpdate : शरद पवारांनी भूषवावे यूपीएचे अध्यक्षपद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रस्ताव

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र करण्यासाठी ते सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. या बैठकीत शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत. स्वत: शरद पवार हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला आहे. शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच भाजपला रोखता येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष रविकांत वर्पे उपस्थित आहेत. आता यूपीए अध्यक्ष बनवण्याच्या संदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर स्वत: शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात पवारांची तोफ
दिल्ली येथील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात तोफ डागली आहे. ते म्हणाले कि , राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत ११० धाडी टाकल्या आहेत. एकाच व्यक्तीविरोधात आणि त्याच्या कुटुंबीयांवर इतक्या धाडी पडण्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही बघितला आहे का, असा प्रश्न त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. ते पुढे म्हणाले कि , अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर ईडीने ५०, सीबीआयने ४० आणि प्राप्तीकर खात्याने आतापर्यंत २० धाडी टाकल्याचा उल्लेखही पवार यांनी केला.
दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या सल्ल्यानुसार आता विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात एकत्र बसून रणनीती ठरवतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळीत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजप राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पाठवलेल्या पत्रासंदर्भातही भाष्य केले. ममता बॅनर्जी यांनी या पत्राच्या माध्यमातून काही सल्ले दिले आहेत. बिगरभाजप राज्यांनी एकत्र येऊन केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर रोखण्यासाठी काहीतरी ठरवले पाहिजे. रणनीती निश्चित केली पाहिजे, असे ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. त्यानुसार आता विरोधी पक्षाचे नेते संसदेत भेटून याविषयी चर्चा करतील,असे शरद पवार यांनी सांगितले.
‘काश्मिरी फाईल्स’वरही बोलले शरद पवार
यावेळी शरद पवार यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंदर्भातही भाष्य केले. काश्मिरी पंडित विस्थापित झाले तेव्हा केंद्रात भाजपच्या व्ही.पी.सिंह यांचे सरकार होते. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री होते. तर काश्मीरचे राज्यपाल कोण होते, हे सर्वांनाच माहिती आहे. आज ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून इश्यू निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले. काश्मिरी पंडित विस्थापित झाले हे देशासाठी चांगले झाले नाही. पण जे झालं ते विसरून समाजात एकोपा कसा राहील, हे पाहिले पाहिजे, असेही शरद पवार यांनी म्हटले.