PanjabElectionUpdate : पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी 63.44 टक्के मतदान , सयामी जुळ्यांनीही केले मतदान … !!

अमृतसर : पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी आज मतदान पार पडले . सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात एकूण 63.44 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. त्यात मानसा येथे सर्वाधिक मतदान झाल्याची बातमी आहे. येथे 73.45 टक्के मतदान झाले आहे. त्याचवेळी मोहालीमध्ये सर्वात कमी 53.10 टक्के मतदान झाले. राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सुमारे 5 टक्के आणि 11 वाजेपर्यंत केवळ 17.77 टक्के मतदान झाले होते. मात्र, दुपारी मतदान केंद्रांवर संथ गतीने मतदान झाले. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार असून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकांचे निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहेत.
आज राज्यातील 2.14 कोटींहून अधिक मतदारांनी 117 मतदारसंघातील एकूण 1304 उमेदवारांच्या भवितव्यावर ईव्हीएमद्वारे शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पटियालामधून आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला असून आपली आघाडी संपूर्ण राज्य जिंकेल, असे म्हटले आहे. या निवडणुकीत संपूर्ण राज्यातून काँग्रेसचा सफाया होईल, असा दावाही कॅप्टन यांनी केला. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि वडील प्रकाश सिंग बादल आणि पत्नी हरसिमरत कौर यांनी मुक्तसरमध्ये मतदान केले. यावेळी प्रकाश सिंह बादल यांनी अकाली दल आणि बसपा युती 80 जागा जिंकेल असा दावा केला.
विशेष घटना , सयामी जुळ्यांनी केले मतदान
दरम्यान अभिनेता सोनू सूदची कार मतदान केंद्रात घुसवल्यामुळे मोगा पोलिसांनी जप्त केली . मात्र, या घटनेला कोणत्याही अधिकाऱ्याने दुजोरा दिलेला नाही. सोनू सूदची कार मोगा येथील सिटी पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली तेव्हा सोनू सूद गाडीतच होता. याशिवाय अमृतसरचे संयमी जुळे भाऊ सोहना आणि मोहना, ज्यांना गेल्या वर्षी पंजाब सरकारने नोकऱ्या दिल्या होत्या, त्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. हे जुळे भाऊ अमृतसरमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी आले तेंव्हा अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
दोघेही करतात सरकारी नोकरी…
याबद्दल बोलताना पीआरओ गौरव कुमार यांनी सांगितले की, ही खूप वेगळी बाब आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला योग्य पद्धतीने व्हिडिओग्राफी करण्यास सांगितले होते. ते शारीरिकदृष्ट्या जोडलेले आहेत, परंतु दोघांचे मतदार वेगळे आहेत. दोघांमध्ये मतदानाची गुप्तता पाळावी म्हणून आरओने त्यांना चष्मा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सोहना आणि मोहना पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (PSPCL) मध्ये काम करतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 19 वर्षीय सोहनाला नोकरी मिळाली आणि त्याने 20 डिसेंबर 2021 रोजी काम सुरू केले. तो मोहनासह पीएसपीसीएलमधील विद्युत उपकरणांची काळजी घेतो. या संयमी जुळ्या भावांचा जन्म 14 जून 2003 रोजी नवी दिल्ली येथे झाला. जन्मानंतर, सोहना आणि मोहना यांना त्यांच्या पालकांनी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नेले. शस्त्रक्रियेत अडचणी येऊ शकतात म्हणून एम्सच्या डॉक्टरांनी दोघांना वेगळे करण्याचा निर्णय सोडून दिला होता, त्यामुळे दोघांना वेगळे केले नाही.