MPSCInformationUpdate : राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा रद्द

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येत्या २ जानेवारी रोजी घोषित केलेली एमपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोगातर्फे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. आयोगाने जारी केलेल्या निवेदनामध्ये परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने याबाबतचे परिपत्रक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , “राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे”.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/tjqHxgbdkw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 28, 2021
कोरोनामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी परीक्षा
दरम्यान या ट्वीटमध्ये आयोगाने जरी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे कि , “कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देणे यासंदर्भात शासनाकडून निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे”. तसेच, “परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल” असेही यात म्हटले आहे.