MaharashtraNewsUpdate : एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा अनिल परब यांचा इशारा

मुंबई : सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्याचे प्रयत्न होत असले तरी विलीनीकरणाच्या मागणीसाठी न्यायालयात गेलेले कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने सरकारबरोबरच राज्यातील जनताही चांगलीच अडचणीत आली आहे . यावर पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे कि , कामगारांचे जसे आमच्यावर दायित्व आहे. तसेच जनतेचेही दायित्व आमच्यावर आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी आपला मुद्दा अधिक ताणून न धरता त्यांनी कामावर परतावे . दोन महिन्याचा पगार मिळाला नाही तर एसटी कामगारांचेच नुकसान होणार आहे. यामुळे कोण्या नेत्याचे नुकसान होणार नाही. दरम्यान सरकारचे आदेश न ऐकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू झाली असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना हा इशारा दिला. एका शब्दावर आडून बसू नका. बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. आता एसटी विरोधातील कारवाई तीव्र करावी लागेल. आम्हाला जनतेलाही उत्तर द्यायचे आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे कामावर या.
दरम्यान ओबीसी आरक्षणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले कि , ओबसी आरक्षणामुळे सरकार अडचणीत नाही. सरकार उद्या ठराव करीत आहे. इम्पिरिकल डेटा होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नये असा ठराव केला जाणार आहे. आमची तीच भूमिका आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या शिवाय विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले कि , अध्यक्षाचे नियम बदलले आहेत. हात उंचावून मतदानाचा नियम पारित झाला आहे. हात वर करून किंवा आवाजी मतदानानेच ही निवडणूक होईल. तसा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे निवडणुकीला सरकार घाबरले असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मतदानात कुणाला किती मतदान मिळाले हे कळेलच. आम्ही राज्यपालांना फाईल पाठवली आहे. २८ डिसेंबरला निवडणूक घ्यायची आहे. आता बॉल राज्यपालांच्या कोर्टात आहे.