CoronaIndiaNewsUpdate : जगावर कोरोनाच्या नव्या अवताराचे संकट !! भारतातील ‘त्या’ दोन विदेशी प्रवाश्यांचा वैद्यकीय अहवाल जाहीर…

नवी दिल्ली : जग आधीच कोरोनाच्या भयाने भयग्रस्त असतानाच दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे जगात पुन्हा खळबळ उडाली आहे. दरम्यान वृत्तानंतर दक्षिण आफ्रिकेवर निर्बंध लागू झाले असून नवा व्हेरिअंट गेल्या चार दिवसांत ११ देशांमध्ये पोहोचला असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आफ्रिकेहून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना असल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात होती मात्र या दोघांनाही नवा व्हेरिअंट ओमीक्रॉनची नव्हे तर डेल्टाची लागण झाली असल्याचे उघड झाले आहे.
उपलब्ध माहितीनुसार या दोन्ही आफ्रिकन नागरिकांना दुसऱ्या लाटेला कारणीभूत असलेल्या डेल्टा व्हेरिअंटची लागण झाली आहे. आफ्रिकेतून बंगळुरुला आलेले दोन व्यक्ती ११ आणि २० नोव्हेंबरला कोरोनाबाधित सापडले होते. याच काळात नव्या व्हेरिअंटने आफ्रिकेत हात पाय पसरण्यास सुरुवात केली होती. नव्या व्हेरिअंटची घोषणा होताच बंगळुरुच्या आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली होती. या दोघांचे पुन्हा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट आले आहेत. दरम्यान ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सर्व परदेशी प्रवाशांसाठी विमानतळावर स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. यासोबतच केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठीही आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून १ ते २६ नोव्हेंबर दरम्यान भारतात एकूण ९४ लोक भारतात आले आहेत आणि त्यापैकी फक्त दोन लोकांमध्ये कोरोना विषाणूचे पूर्वीचे प्रकार आढळून आले आहेत. या दोघांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून ते वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत WHO ने ओमिक्रॉन प्रकार प्रथम शोधला होता. यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि यूकेमध्येही त्याचे रुग्ण आढळून आले असल्याचे म्हटले आहे.
ओमिक्रॉन काय आहे ?
दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला करोना व्हायरसचा नवीन प्रकार हा अत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीने म्हटले आहे. करोनाच्या या नवीन प्रकाराला ग्रीक वर्णमालेनुसार करोनाच्या या नव्या प्रकाराला ‘ओमिक्रॉन’ असे नाव दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या या नव्या प्रकाराची घोषणा शुक्रवारी केली. या वर्गात कोरोनाचा डेल्टा प्रकारचा व्हायरस देखील ठेवण्यात आला होता. हा डेल्टा प्रकार जगभरात पसरला होता. आता वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्याने तो अधिक धोकादायक असू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हायरसने अनेक देशांच्या प्रवासावर पुन्हा बंदी घालण्यास भाग पाडले आहे.
बूस्टर डोसनंतरही संसर्गाचा धोका कायम
विशेष म्हणजे कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस घेतल्यानंतरही संसर्ग झालेल्या करोनाच्या या नव्या प्रकाराची घोषणा दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी गुरुवारी केली होती. आता तो इस्रायल आणि बेल्जियम या दोन अन्य देशांमध्येही आढळून आला आहे. यापूर्वी बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्येही रुग्ण आढळले आहेत. या प्रकाराचे सुमारे १०० जीनोम अनुक्रमांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. करोनाच्या या नव्या प्रकारच्या (ओमिक्रॉन) चा संसर्ग झालेल्या अनेक नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण लसीकरण झाले होते. यामध्ये एका इस्रायली व्यक्तीचा समावेश आहे ज्याला लसीचा बूस्टर डोस देखील देण्यात आला होता.
अत्यंत वेगाने पसरतोय करोनाचा ‘ओमिक्रॉन’ वेरियंट
भारताने १५ डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. पण कोरोनाचा हा नवीन प्रकार म्हणजे ओमिक्रॉन हा डेल्टासह इतर कोणत्याही प्रकारापेक्षा अधिक वेगाने पसरत आहे, असे विश्लेषण शास्त्रज्ञांनी केले आहे. ज्यांनी पूर्णपणे लसीकरण के ले आहे त्यांनाही या व्हायरसचा संसर्ग होतोय. कोरोनाच्या या नव्या प्रकारावर लसीच्या परिणामकारकतेवर देखील परिणाम होऊ शकतो, असे संकेत आहेत. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट ओमीक्रॉनची व्याप्ती आता ११ हून अधिक देशांत वाढली आहे. तज्ज्ञांनुसार हा व्हायरस डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही जास्त खतरनाक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हा व्हायरस धोकादायक असल्याचे म्हटले आहे. जिथे डेल्टाचे दोन म्युटेशन झाले होते, तिथे ओमीक्रॉनचे ३० हून अधिक म्युटेशन समोर आले आहेत.
शास्त्रज्ञांच्याही वाढल्या चिंता
ओमीक्रॉनने जगासोबत शास्त्रज्ञांच्याही चिंता वाढविल्या आहेत. पहिल्यांदा आफ्रिकेत हा व्हेरिअंट २४ नोव्हेंबरला सापडला होता. त्यानंतर २६ नोव्हेंबरला हा व्हेरिअंट ५ देशांमध्ये पसरला होता. तर २८ तारखेला म्हणजेच आजपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिअंट ११ देशांमध्ये पसरला आहे. काही वैज्ञानिकांनुसार हा व्हेरिअंट या ११ देशांतच नाही तर आणखी डझनभर देशांत पोहोचला आहे. याचे रुग्ण हळू हळू समोर येऊ लागतील. यामुळे या व्हेरिअंटचा कहर आणखी काही देशांमध्ये दिसू लागण्याची शक्यता आहे.
ओमिक्रॉन प्रकार आतापर्यंत आफ्रिकेपासून युरोपपर्यंतच्या देशांमध्ये आढळला आहे. बोत्सवानामध्ये पहिल्यांदा हा व्हेरिअंट लक्षात आला. परंतु पहिला रुग्ण शोधणारा देश हा दक्षिण आफ्रिका होता. इतर देशांनी नवीन प्रकाराबद्दल प्रवास निर्बंध किंवा चेतावणी जारी करण्यापूर्वी हा व्हेरिएंट यूके, बेल्जियम, जर्मनी, इस्रायल, झेक प्रजासत्ताक, इटली, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरला आहे. मात्र अद्याप नेदरलँड्समध्ये याच्याशी संबंधित दोन रुग्णांची पुष्टी झालेली नाही.
विदेशी प्रवास सेवेबद्दल पुनर्विचार
ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंट सापडला आहे, त्यापैकी भारताने हवाई बबल अंतर्गत विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी तीन देशांशी करार केले आहेत. हे देश ब्रिटन, जर्मनी आणि नेदरलँड्स आहेत. अशा परिस्थितीत भारतातून या तिन्ही देशांच्या उड्डाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केली होती की १५ डिसेंबरपासून सर्व देशांसोबत विमानसेवा पूर्ववत केली जाईल, परंतु पंतप्रधान मोदींनी एक दिवसापूर्वी कोरोनावरील उच्चस्तरीय बैठकीनंतर या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे सांगितले आहे.