MaharashtraPoliticalUpdate : हजार कोटींचा घोटाळा ? सोमय्यांनी १०० कोटीत जमिनीसह कारखाना घ्यावा , खोतकरांचे खुले आव्हान

औरंगाबाद : “मी नेमका राजकारणात पदार्पण करत असेल त्यावेळी कारखाना उभा राहिला आहे. जिल्हाधिकारी, शासनाच्या परवानगीने ही जमीन दिलेली आहे. त्यांना कारखाना हवा असेल तर मी मालकाशी बोलतो. जमीनीसह त्यांना आम्ही १०० कोटी रुपयात कारखाना द्यायला तयार आहोत”, असे प्रति आव्हान शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांना दिले आहे. सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर त्यांनी जालन्याचा रामनगर साखर कारखाना बेनामी पद्धतीने विकत घेत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे.
या आरोपाला उत्तर देताना खोतकर यांनी म्हटले आहे कि , “सोमय्या यांनी केलेले आरोप हे धांदात खोटे आहेत. मी कारखान्याचा मालक नसून शेअर होल्डर आहे. जे खरं आहे ते सर्व रेकॉर्डवर आहे. मी त्या कारखान्यात फक्त ७० लाखांपर्यत शेअर होल्डर म्हणून आहे. मी कारखान्याचा मालक नाही. तो कारखाना मी विकत घेतलेला नाही. त्या भागातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सुरु व्हावा म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान “किरीट सोमय्या आमचे मित्र आहेत. हे किरीट सोमय्या बोलत नाहीय तर त्यांना दुसरं कुणीतरी बोलायला लावत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितल्यानुसार सोमय्यांनी आरोप केले आहेत”, असा दावाही खोतकरांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांचा आरोप काय आहे ?
किरीट सोमय्या यांनी खोतकरांवर १०० कोटी घोटाळ्याचा आरोप केला आहे. खोतकरांनी रामनगर साखर कारखाना हा बेनामी घेतला. तसेच त्यांनी शेतकऱ्यांची १ हजार कोटींची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, असे गंभीर आरोप सोमय्यांनी केले आहेत. “राज्य सरकारची १०० एकर जमीन बळकवण्याचा अर्जुन खोतकर यांचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांनी जी जमीन कारखान्यासाठी दिली आहे त्याची आज मार्केट वॅल्यू १ हजार कोटींच्या आसपास आहे. साखर कारखाना तर कधी चालू झालाच नाही. कामगाराचे पैसेही दिले नाही. पण त्या जागेवर बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉम्पलेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारी मी ईडीपासून राज्य मंत्रालयापर्यंत दिल्या”, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले असून खोतकरांनी रामनगर साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला, असा आरोप केला आहे.