मी वाट बघतोय की पाकिस्तानात कधी बॉम्ब फुटणार – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. राजकीय फटाक्यांची आवश्यकता नसून काही लोक म्हणत आहेत की दिवाळीनंतर बॉम्ब फुटणार. मात्र मी वाट बघतोय की पाकिस्तानात कधी बॉम्ब फुटणार आहेत, असे बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते की, नवाब मलिक हे दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आणताना दिसत आहेत. त्यांनी ट्विट केलेला फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली होती, म्हणून आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. त्याद्वारे मी त्यांना मदत करत होतो. जयदीप राणा हा भाड्याने आणलेला माणूस आहे, असे रिव्हर मार्चने स्पष्ट केल्याने त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. हे स्पष्टीकरण देतानाच फडणवीस यांनी मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर बाँब फोडणार, अशा शब्दात आव्हान दिले होते. फडणवीस यांच्या याच विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत असतांना या टीकेवर प्रतिक्रिया दिली. “मी पाकिस्तानमध्ये बाँब फुटायची वाट बघतोय”. दरम्यान मुख्यमत्र्यांनी राज्यातील लसीकरण मोहिमेवर देखील भाष्य केलेय. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील लसीकरण कमी झाले आहे. नागरिक लसीकरणासाठी कमी प्रमाणात येत आहेत हे त्याचे कारण आहे. मात्र, नागरिकांना लसीकरणासाठी पकडून पकडून आणू शकत नाही. तसेच करोनाची तिसरी लाट येणार किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री घरूनच काम करत असतात मंत्रालयात जात नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर नेहमीच होत असते. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. मंत्रालय हे कार्यालय असल्याने मंत्रालयात नक्कीच जायला पाहिजे. पण गेलो नाही म्हणून कामे झालेली नाहीत असे झाले आहे का?, असा सवाल उपस्थित करत मंत्रालयात जातो येतो, पाट्या टाकतो याला काही अर्थ नाही. वर्षा बंगल्यात कार्यालय आहे, इथून काम सुरू आहे. इतकी वर्षे जे मंत्रालयात जात होते त्यांनी जे काय केले ते मला निस्तरायचे आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला आहे.