MumbaiNCBNewsUpdate : आर्यन खान अटक प्रकरणात नवा ट्विट , काय आहे प्रकरण ? समीर वानखेडे यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना बचावात्मक पत्र !!

मुंबई : एनसीबीने क्रूझवर कारवाई करून आर्यन खानसह इतरांना केलेले अटक प्रकरण गाजत असतानाच या प्रकरणात पंच किरण गोसावी याने शाहरुख खानकडे २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप झाल्यामुळे या परकरणाने वेगळेच वळण घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एनसीबीने हे आरोप फेटाळून लावले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना बचावात्मक पत्र लिहिले आहे.
या सर्व प्रकरणात प्रभाकर साईल याने एनसीबीच्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि , ‘माझ्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहे. माझ्यावर गुप्त हेतू ठेवण्यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही याची खात्री करावी. तसेच, मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, हे प्रकरण माझ्या वरीष्ठाकडे आहे. मला तुरुंगात टाकण्याच्या आणि सर्विसमधून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून देण्यात आल्या. हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवले आहे. त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी याचनाच वानखेडेंनी या पत्राद्वारे केली आहे.
काय आहेत प्रभाकर साईलचे आरोप ?
स्वतःला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचे सांगणाऱ्या प्रभाकर साईल याने एनसीबीच्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. प्रभाकरच्या आरोपानुसार त्याने केपी गोसावीला २५ कोटींबद्दल बोलताना ऐकले होते आणि ते डील १८ कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचे फायनल झाले होते. तसेच प्रभाकरचा दावा आहे की, त्या डीलपैकी त्यातले ८ कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असे बोलणं सुरू होते.
क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे १५ मिनिटे निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिले असल्याचा दावाही प्रभाकरने केला आहे. त्यानंतर गोसावीने आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितले . एनसीबीने त्याला १० साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्याने म्हटले आहे. तसेच आपण गोसावी यांना ५० लाख रोख रक्कम भरलेल्या २ पिशव्या दिल्या. तसेच १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता गोसावीने फोन केला आणि २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितले, असेही प्रभाकर साईल याने म्हटले आहे. दरम्यान गोसावीने आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असेही प्रभाकरने म्हटले आहे.
Mumbai: NCB Zonal Director Sameer Wankhede writes to Mumbai Police Commissioner requesting him to "ensure that no precipitate legal action is carried out to frame me with ulterior motives." pic.twitter.com/dixPdizZgE
— ANI (@ANI) October 24, 2021
एनसीबीने फेटाळले आरोप
दरम्यान, एनसीबीने एक पत्र प्रसिद्ध करून प्रभाकर साईलच्या आरोपावर खुलासा केला आहे. प्रभाकर साईल हा या प्रकरणातला साक्षीदार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बोलणे योग्य नाही. त्याला जर या प्रकरणाची आणखी काही माहिती असेल तर न्यायालयात द्यावी, असा खुलासा एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी केला आहे. तसंच, प्रभाकर साईल याने केले सर्व आरोप हे समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहे, असंही या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.स्वतः समिर वानखेडे यांनीही पंच प्रभाकर साईलचे सर्व आरोप फेटाळून लावले असून एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले की, मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देईल.
नवाब मलिक यांचा पुन्हा आरोप
दरम्यान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात श्रीमंतांना अडकवून वसुली केली जात असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईत अंमली पदार्थ प्रकरणात जी कारवाई होत आहे, ती केवळ वसुलीच्या उद्देशाने केली जात असून या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे. गोसावीच्या बॉडीगार्डनेच आर्यन खान अंमली पदार्थप्रकरणी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे हे षडयंत्र समोर आले आल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. ज्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत, तेदेखील याविषयी बोलतीलच, असेही त्यांनी म्हटलं आहे.
बोगस केसेस तयार करून सेलेब्रिटी आणि श्रीमंतांना त्यात अडकवायचे आणि त्यांच्याकडून तोडपाणी करून पैसे लाटायचे, असा उद्योग एनसीबीतील अधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थप्रकरणी गेल्या वर्षी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉलिवूडधील अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र अद्याप एकालाही साधी अटकदेखील करण्यात आलेली नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर टीकास्त्र सोडले.
चौकशीसाठी एसआयटीची मागणी
नवाब मलिक यांनी , एनसीबी अधिकाऱ्यांकडून होणारी वसुली ही चिंतेची बाब असून गोसावी कोण आहे ? संघटित गुन्हेगारी सुरु झाली आहे का ? या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. परमबीर सिंह सारखे लोक पुन्हा सक्रीय झाले असून त्यामुळे तोडपाण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या आपण बीडला असून त्यानंतर परभणी आणि बीडला जाणार असून मुंबईत परत आल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपने झटकले हात
दरम्यान या सर्व प्रकरणात पंच किरण गोसावी याने शाहरुख खानकडे २५ कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर येताच या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, ‘समीर वानखेडे हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही’ अशी सावध प्रतिक्रिया देऊन आपले हात झटकले आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना पाटील यांनी आपली हि प्रतिक्रिया दिली. ‘समीर वानखेडे हा भाजपचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही. जर या प्रकरणी आज काही एनसीबीवर आरोप करण्यात आले आहे. ज्यांनी कुणी केले आहे. त्या आरोप केले असल तर त्याची चौकशी व्हावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.